प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाटी येथे बुधवारी महाराष्ट्र भटक्या व विमुक्त दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक महासंघ तसेच सहारा सोशल ग्रुप, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता बी. डी. भालेकर मैदानापासून निघणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व उमाकांत गवळी, लताबाई बर्डे, इम्तियाज नूर मोहमंद शेख, दलित मुस्लिम क्रांती मंचचे संस्थापक अध्यक्ष शाम गायकवाड, सहारा सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कय्युम शेख हे करणार आहेत. शालिमार, नेहरू गार्डन, महात्मा गांधी रस्ता, मेहेर सिग्नल याामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. महाराष्ट्र आणि केंद्र शासन यांच्या वतीने तळागाळातील समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची कागदपत्रे संबंधित अधिकारीवर्ग देण्याबाबत टाळाटाळ करतात, अशी तक्रारही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात करण्यात आली आहे. रेशनकार्ड तत्काळ देण्याची मागणीही करण्यात आली आहे. अतिरिक्त धान्य कोटा २००८ पासून दिलेला नाही. ज्या अधिकाऱ्यांनी दुकानदारांच्या सहाय्याने जनतेची फसवणूक केली आहे, या योजनेपासून नागरिकांना वंचित ठेवले आहे, अशा संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे तसेच व्यवस्थितरित्या धान्य वितरण करणाऱ्या दुकानदारांना अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, पीर सादिक शॉँ हुसेनी यांचे नाव उड्डाणपुलास द्यावे, भारतनगर, शिवाजीवाडी (नंदिनीनगर) येथील स्थानिक रहिवाशांचे सव्‍‌र्हे करून त्यांना घरकुलासाठी प्राधान्य देणे, जातीच्या दाखल्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे जमा करण्यात शिथिलता आणावी, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

Story img Loader