ठाणेकर रसिकांची वैचारिक भूक भागवणारी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला ९ जानेवारी पासून सुरू होत आहे. ९ ते १५ जानेवारी या कालावधीत नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी शाळेच्या मैदानावर रंगणाऱ्या व्याख्यानमालेचे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वेळी प्रभू यांचे ‘उद्याचा भारत’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. उर्वरित पाच दिवसांत अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षा फैयाझ, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, पोपटराव पवार, वैद्य सुचित्रा कुलकर्णी, डॉ सदाशिव शिवदे यांची व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेच्या समारोपानिमित्त ‘लोकमान्य’ चित्रपटाचे कलावंत आणि तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.
रामभाऊ व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार १० जानेवारी रोजी अखिल भारतीय नाटय़ संमेलन अध्यक्षा अभिनेत्री फैयाझ यांची मुलाखत कवी अरुण म्हात्रे घेणार आहेत. रविवार ११ जानेवारी रोजी ‘सेवाग्राम ते शोधग्राम’ या विषयातून डॉ. अभय बंग त्यांचा जीवनप्रवास उलगडणार आहेत. कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी सोमवार १२ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार ‘नागरी समस्या व स्वयंपूर्ण गाव’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर मंगळवार १३ जानेवारी रोजी ‘सामना नव्या आजारांशी’ या विषयावर वैद्य सुचित्रा कुलकर्णी व्याख्यान देणार आहेत. बुधवार १४ जानेवारी रोजी डॉ. सदाशिव शिवदे ‘संभाजी’ महाराजांचा जीवनपट उलगडणार आहेत. व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशी गुरुवार १५ जानेवारी रोजी लोकमान्य चित्रपटातील कलाकारांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम होणार आहे. ‘लोकमान्य एक युगपुरुष’ चित्रपट घडवतानाचे प्रसंग या वेळी उलगडण्यात येणार आहे. यामध्ये अभिनेता सुबोध भावे, ओम राऊत, अंगद म्हसकर, निखिल साने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. निवेदक मिलिंद भागवत या सर्वाशी संवाद साधणार आहेत. दररोज रात्री ८ वाजता ही व्याख्याने होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा