महायुतीत रिपाइंने लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या ३५ जागांबाबत लवकर निर्णय झाला तर पक्षाला निवडणुकीची स्वतंत्रपणे तयारी करायला वेळ मिळेल. सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवण्यासाठी १९ मे रोजी पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बीड येथे विभागीय मेळावा होणार आहे. या मेळाव्याला एक लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केला. पक्ष भावनेपेक्षा अर्थिक आणि दलित अत्याचाराच्या विरोधात लढा उभा करेल, असेही ते म्हणाले.
 महाराष्ट्रात मागील काही वर्षांमध्ये दलितांवरील अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरू आहे. या अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी आणि आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवण्यासाठी १९ मे रोजी बीड येथे सर्कस ग्राऊंडमध्ये सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत अतिक्रमण कलेल्या गायरान जमिनी दलितांच्या नावावर व्हाव्यात, यासाठी कसे प्रयत्न करायचे या मुद्यावर चर्चा होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे पक्षाने चार जागा मागितल्या असून, त्यात मराठवाडय़ातील लातूर मतदारसंघाचा समावेश आहे. तर विधानसभेच्या ३५ जागांची मागणी करण्यात आली आहे. भाजप-शिवसेना युतीने जागावाटपाचा लवकर निर्णय घेतला तर मागणी केलेल्या ३५ ठिकाणी निवडणुकीची तयारी करायला वेळ मिळणार आहे. या वेळी केवळ आरक्षित मतदारसंघातून पक्ष निवडणूक लढवणार नाहीतर खुल्या व इतर प्रवर्गातील मतदारसंघातही पक्ष लढवणार आहे.

Story img Loader