विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी रिपाइं कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत भाजपचा विजय साजरा केला. ढोल-ताशा, बॅंडबाजा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत खुद्द आठवलेही विजयोत्सव साजरा करण्यात दंग झाले होते.
सकाळी दहाच्या सुमारास निकालाचा कल स्पष्ट होऊ लागला होता. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याचे दिसू लागताच आठवले यांच्या संविधान बंगल्याच्या बाहेर रिपाइं कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. बँडबाजा व फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. मिठाई वाटण्यात आली. खुद्द आठवलेही बँडपथकात सहभागी झाले. दलित मतदारांच्या पाठिंब्यामुळेच भाजपला विजय मिळाल्याचा दावा आठवले यांनी केला. महाराष्ट्राच्या हितासाठी भाजप व शिवसेनेने एकत्र यावे व सत्ता स्थापन करावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर काही तासातच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सरकार बनविण्यासाठी पाठिंबा देण्याचे जाहीर केले. तर, भाजपच्या विजयाचा इतका जल्लोष करण्यात आला की, त्यामुळे रिपाइंच्या उमेदवारांचे काय झाले ते जिंकले की हारले, याचा आठवले यांच्यासह सर्वानाच विसर पडला होता.

Story img Loader