रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या ठाणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात आपणास महायुतीच्या नेत्यांकडून कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही म्हणून बंडाचा झेंडा उभारला आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लोकसभेचे तीन मतदारसंघ आहेत. महायुतीसाठी काम करा म्हणून प्रचारासाठी कार्यकर्त्यांना महायुतीच्या नेत्यांनी विश्वासात घेतले नाही. त्यामुळे असंख्य कार्यकर्ते नाराज झाले आहेत असे सांगत ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळाराम गायकवाड यांनी या निवडणुकीत आमचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा असणार नाही असे पत्रकार परिषदेत मंगळवारी स्पष्ट केले.
यावेळी १३ तालुक्यांतील रिपब्लिकन आठवले गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. आठवले गटात, महायुतीत आम्ही सक्रिय राहणार आहोत. आमच्या वैचारिक नाराजीचे कारण पक्ष अध्यक्ष रामदास आठवले यांनी समजून घ्यावे एवढीच आमची मागणी आहे.
यावेळी तुम्ही मनसेला किंवा अन्य पक्षांना पाठिंबा देणार का, या प्रश्नावर त्यांनी आमचा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा राहील असे सांगून संदिग्ध भूमिका ठेवली. यावेळी श्याम शेवाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader