पालिका घरकुल घोटाळा प्रकरणात आमदार सुरेश जैन यांना षडयंत्र करून अडकविण्यात आल्याचा आरोप करीत महापालिका निवडणुकीत शहरातील विकासाच्या मुद्यावरून आम्हाला शंभर टक्के यश मिळणार असल्याचा दावा सुरेश जैन यांचे बंधू व स्थायी समिती सभापती रमेश जैन यांनी केला आहे.
घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना १० मार्च २०१२ रोजी अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेला नुकतेच सव्वा वर्ष पूर्ण झाले. या दरम्यान जिल्हा न्यायालयापासून उच्च व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी त्यांचा जामीन फेटाळला आहे. आगामीा महापालिका निवडणुकीपूर्वी ते या प्रकरणातून बाहेर येतील की नाही याची शाश्वती नसल्याने आघाडीने त्यांच्या अनुपस्थितीत निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सुरेश जैन यांना अटक झाल्यानंतर सुमारे सव्वा वर्षांनी त्यांचे बंधू रमेश जैन यांनी   आपल्या भावास षडयंत्र करून अडकविण्यात आल्याचे म्हटले आहे. इतक्या दिवसात रमेश जैन गप्प का होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील खान्देश विकास आघाडीच्या निवडणूक तयारीची माहिती देताना रमेश जैन यांनी आपले म्हणणे मांडले. आगामी निवडणुकीत शहरातील विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांसमोर जाणार आहोत. सुरेश जैन यांच्या संकल्पनेतून शहराचा झालेला विकास पाहता शंभर टक्के यश आम्हाला मिळेल असे त्यांनी नमूद केले. सुरेश जैन यांच्या गटाने तत्कालीन नगरपालिका व आताच्या महापालिकेतही सुमारे तीन दशके सत्ता गाजविली आहे. या कार्यकाळात विकासाचे मुद्दे चर्चेत नसले तरी घरकुल घोटाळ्याबरोबरच, वाघुर पाणी पुरवठा योजनेतील कोटय़वधीचा गैरव्यवहार, शहरातील रस्ते डांबरीकरण कामाचा घोटाळा, विमानतळ विकासचा घोटाळा आदी घोटाळे चर्चेत आलेले आहेत. पोलिसांमध्ये गुन्हेही दाखल झाले आहेत.
जळगाव शहरात सार्वजनिक स्वच्छतेची समस्या गंभीर आहे. रस्ते साफ केले जात नाहीत, गटारी तुंबलेल्या व ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग, त्यातून सुटणारी दरुगधी आणि आरोग्याचा प्रश्न कायम आहे.
शहरात सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे कमी प्रमाणात आहेत. त्यांचीही आवस्था चांगली नाही. स्वच्छतेसाठी खासगी मक्तेदारांना मक्ते देण्यात आलेले असताना त्यांचे काम समाधानकारक नाही. शहरातील एक-दोन उद्याने वगळता सर्वच उद्यानांची आवस्था भकास आहे. उद्यान विकासाच्या नावाने दरवर्षी निधी दाखविण्यात येतो. पण तो खर्च कुढे होतो हा प्रश्न आहे. महापालिकेच्या शाळांचीही अवस्था चांगली नाही व बऱ्याच शाळा खासगी संस्था व कंपन्यांना बहाल करण्यात आल्या आहेत.
जळगाव शहरातील मोजकेच प्रमुख रस्ते वगळता रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. साने गुरूजी चौक ते कोंबडी बाजार चौक आणि तेथून पुढे सागर हायस्कूल पर्यंत तसेच शनि मंदिर ते ममुराबाद रस्त्याला भिडणाऱ्या रेल्वे पुलापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा पाहता पालिकेचा रस्ते विकास कार्यक्रम समोर दिसतो.
संपूर्ण शहर अतिक्रमणग्रस्त आहे. वाहनतळांची व्यवस्था नाही. जेथे वाहनतळ आहेत त्या जागा अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केल्या आहेत. परिणामी लोकांनी वाहनांसाठी रस्त्याचा वापर करणे सुरू केले आहे. जळगाव शहर सर्व बाजुंनी असे समस्याग्रस्त असताना रमेश जैन यांनी मात्र सुरेश जैन यांच्या संकल्पनेतून शहराचा विकास झाल्याचा दावा केला आहे तो हास्यास्पद म्हटला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा