ताडोबा अभयारण्यालगतच्या आष्टा गावात शिरून वाघिणीने धुमाकूळ घातला आहे. जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर तिने केलेल्या हल्ल्यात वनपाल गंभीर जखमी झाला असून गावात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, लोकांची गर्दी बघून गावात सैरावैरा पळणाऱ्या वाघिणीला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व वन खात्याचे पथक गावात दाखल झाले आहे.
भद्रावती तालुक्यातील आष्टा गावालगत इरई धरणाचा कालवा आहे. आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास ताडोबाच्या जंगलातून या कालव्याच्या रस्त्याने वाघिणीने गावात प्रवेश केला. पहाटेच्या वेळी गावाबाहेर शौचाला जाणाऱ्या लोकांना वाघीण दूरवर दिसली. एखादा वन्यप्राणी असावा म्हणून गावकऱ्यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी आठ वाजता राजू मरापे यांच्या घराच्या अंगणात वाघिणीने ठिय्या मांडला तेव्हा गावात गोंधळ उडाला. वाघिणीला बघण्यासाठी मरापे यांच्या घराशेजारी गावकऱ्यांची गर्दी झाली. ही गर्दी बघून वाघिणीने मरापे यांच्या घरातील ठिय्या सोडून दशरथ सावठाकरे, दिलीप रामकुंडे यांच्या अंगणात प्रवेश केला. धानाच्या ढिगाऱ्यालगत वाघीण येऊन बसली. गावकऱ्यांनी वाघीण गावात शिरल्याची माहिती वन खात्याला दिली. वनाधिकारी सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी पडवे, माडघोशी, सहायक उपवनसंरक्षक अरुण तिखे, उपविभागीय अधिकारी प्रशांत होळकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शेख, ठाणेदार मनवरे, शेगावचे ठाणेदार महेश चव्हाण, इको प्रो या संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. सलग तीन तास वाघिणीने रामकुंडे यांच्या घरी ठिय्या मांडला. याच वेळी तिला जेरबंद करण्याचा प्रयत्न वन कर्मचाऱ्यांनी केला असता हल्ला चढविला. यात वनपाल आर.डब्ल्यू. बोरीकर गंभीर जखमी झाले. वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ती रामकुंडे व लोनबले यांच्या दोन घरांच्या मध्ये असलेल्या मोकळय़ा जागेत जाऊन बसली. वाघीण समोर आणि गावकरी तिच्या मागे असे चित्र होते. वाघीण गरोदर असल्याचे दिसत होते. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडूकर व त्यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तिच्या शारीरिक स्थितीवरून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गरोदर असल्याचे सांगितले. त्यामुळे तिला अतिशय काळजीपूर्वक जेरबंद करण्याचे निर्देश वन खात्याने दिले.
वाघिणीची परिस्थिती लक्षात घेता वन खाते व पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेशुध्दीकरण पथकाला पाचारण करण्यात आले. यानंतर दुपारी तीन वाजतापासून या वाघिणीला बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देण्यासाठी पथक प्रयत्न करीत होत, मात्र काही केल्या वाघीण या पथकाला सकारात्मक प्रतिसाद देत नव्हती. वाघीण गरोदर असून तिला अतिशय काळजीपूर्वक बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन द्यायचे असल्याने वनाधिकारीही कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नव्हते. वाघिणीला बघण्यासाठी भद्रावती, चंदनखेडा, चोरा व लगतच्या गावातील लोकांनी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत वाघीण ‘जैसे थे’ बसून होती तर वन खात्याचे प्रयत्न सुरूच होते. दरम्यान, वाघ व इतर वन्यप्राण्यांचा गावकऱ्यांना नेहमीच त्रास असल्याने वन खात्याने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आष्टाचे सरपंच गोपाल मरापे यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा