सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून कराड तालुक्यातील तांबवे पंचक्रोशीत घुसखोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या अन् अलीकडे अचानक गायब झालेल्या बिबटय़ाचा तांबवे विभागात पुन्हा धुमाकूळ सुरू झाला आहे. साजूर व गमेवाडी येथे बिबटय़ाने दोन शेळय़ा फस्त केल्या असून, बिबटय़ा पुन्हा अवतरल्याने स्थानिक ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे. लोक घराबाहेर व शेतात जाण्यास घाबरू लागल्याने वनखात्यास या बिबटय़ाचा बंदोबस्त करणे अपरिहार्य झाले आहे.
डेळेवाडी व पठारवाडी डोंगर परिसरात वाघधुंडी, कळकाच्या बेटात व पठारवाडीच्या पठारावरील झाडीत लहान बछडय़ांसह चार ते पाच बिबटय़ांचे वास्तव असल्याची चर्चा आहे. अनेकांना डोंगर पायथ्यालगत शेतात काम करीत असताना बिबटय़ाचे दर्शन झाले आहे. बिबटय़ाच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने उपाययोजना करावी अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.
पाच-सहा वर्षांपासून तांबवे परिसरात डेळेवाडी, आरेवाडी, गमेवाडी, साजूर, टेळेवाडी, पठारवाडी, अंबवडे, उत्तर तांबवे या भागात बिबटय़ाचे वास्तव दिसून येत आहे. चार दिवसांत साजूर येथील गणपत परशुराम चव्हाण यांची राहत्या घरासमोरील शेडमध्ये बांधलेली शेळी बिबटय़ाने फस्त केली. गमेवाडी येथील शेळी तर भरदिवसा बिबटय़ाने हल्ला करून ठार केली. या घटनामुळे घबराट निर्माण झाली आहे. दिवसा शेतात कामासाठी हे लोक एकटे जाण्यास धजवत नाहीत. साजूर येथील दरा शिवारात सदाशिव चव्हाण यांच्या शेळीवरही बिबटय़ाने हल्ला करून जखमी केले आहे. येथील शेतकरी अभिजित चव्हाण, संतोष चव्हाण व स्वप्नील चव्हाण यांना बिबटय़ा दिसला आहे. या परिसरात वन विभागाने बिबटय़ाला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते ते पिंजरे ही आता वन विभागाने काढून नेले असल्याने वन खात्याला पुन्हा पिंजऱ्यांची तजवीज करावी लागणार आहे.
कराडजवळ बिबटय़ाचा पुन्हा धुमाकूळ
सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून कराड तालुक्यातील तांबवे पंचक्रोशीत घुसखोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या अन् अलीकडे अचानक गायब झालेल्या बिबटय़ाचा तांबवे विभागात पुन्हा धुमाकूळ सुरू झाला आहे.
आणखी वाचा
First published on: 31-07-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rampage of leopard near karad