महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची ‘इबादत’ केल्यानंतर शुक्रवारी सोलापूर शहर व परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद-ऊल-फितर (रमजान ईद) उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी केली. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षांव केला. दिवसभर घरोघरी शिरखुम्र्याचा आस्वाद घेत सर्वानी ईदचा आनंद लुटला गेला. सकाळी सर्व मशिदी व ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली.
गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली. महिनाभर प्रार्थना व नमाजपठणात मग्न झाल्यानंतर संपूर्ण महिन्याचे रोजे कसे संपले हे कळलेसुध्दा नाही. शेवटी रमजान ईदचे वेध लागले तेव्हा या पवित्र महिन्याला निरोप देताना सर्वाच्या भावना उचंबळून आल्या होत्या. श्रावणमासात आलेल्या रमजान महिन्याच्या अखेरच्या पर्वात काही हिंदू कुटुंबीयांनीही रोजे करून आत्मशुध्दीचा सुखानुभव घेतला. काल गुरुवारी सायंकाळी चंद्रदर्शन होताच ‘ईद का चाँद मुबारक’ म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. ईदच्या दिवशी सकाळी सर्व मशिदी व ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले. अली आदिलशाही ईदगाह (जुनी मील), शाही आलमगीर ईदगाह (पानगल प्रशाला पटांगण), नवीन आलमगीर ईदगाह (होटगी रोड), अहले-हदीस ईदगाह (छत्रपती रंगभवन शेजारी) व आसार महाल ईदगाह (किल्ला वेस) या पाच प्रमुख ऐतिहासिक शाही ईदगाहवर सकाळी ९ ते ११ पर्यंत सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली. देशात व जगात सुख व शांती नांदू दे, बेरोजगारांना रोजगार मिळू दे, आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सर्वाना खऱ्या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली. यानंतर गोरगरीब, अनाथ, भिक्षूक, फकीर, साधूंना दानधर्म करण्यात आला. ऐपतदार कुटुंबीयांनी वार्षिक उत्पन्नातील ठराविक हिस्सा (जकात) गोरगरिबांना दिला.
ईदनिमित्त घरोघरी तयार करण्यात आलेल्या ‘शिरखुम्र्या’ च्या मधुर आस्वादाने ईदचा गोडवा वाढविला. या आनंदामध्ये मुस्लिमांबरोबर हिंदू मित्र परिवारही सहभागी झाला होता. दिवसभर मुस्लिम बांधवांच्या घरी ईद मिलनाची रेलचेल चालू होती. हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून, आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देत होते.
ईदच्या पाश्र्वभूमीवर विजापूर वेशीत गेले आठवडाभर मीना बाजार भरला होता. तसेच नई जिंदगी चौकात अमीना बाजार भरला होता. या बाजारात ईदसाठी लागणाऱ्या विविध वस्तू, साहित्य तसेच कपडे, टोप्या, अत्तर, सुरमा, चप्पल, बूट, सौंदर्य प्रसाधने, सुका मेवा, शेवया, खजूर आदींची खरेदी करण्यासाठी अबालवृद्धांची झुंबड उडाली होती. ईदच्या आदल्या दिवशी रात्रभर या ठिकाणी अक्षरश जत्रेचे स्वरूप आले होते. यात सात कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. प्रचंड महागाई आणि दररोजच्या जीवनाची रणांगणाची लढाई क्षणभर बाजूला ठेवून ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांना मोठी आर्थिक कसरत करावी लागली. दूध खरेदीसाठी सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (दूध पंढरी), शिवामृत (अकलूज), लोकमंगल दूध संस्था व अन्य दूध संस्थांसह खासगी दूध विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागले. ईदनिमित्त सुमारे पाच लाख लिटर दुधाची विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
सोलापुरात रमजान ईद उत्साहात
महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची ‘इबादत’ केल्यानंतर शुक्रवारी सोलापूर शहर व परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद-ऊल-फितर (रमजान ईद) उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-08-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramzan eid celebrated in enthusiasm in solapur