नव्याने इंडस्ट्रीत आलेल्या काहींनी जुन्यांची जागा भरून काढली आहे. जॉन अब्राहमपाठोपाठ मुलींना वेड लावणारा इम्रान हाश्मी भट्ट कॅम्पमध्ये दाखल होऊन काहीच वर्षे उलटली आहेत. मात्र आता इम्रानच्या जागी रणदीप हुडाची वर्णी लागली आहे. ‘जिस्म २’च्या पाठोपाठ ‘मर्डर ३’मध्येही हॉट सीन्स देणाऱ्या रणदीपच्या रूपात भट्ट कॅम्प आता नवीन ‘हॉट बॉय’ देण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘जिस्म २’ आणि ‘मर्डर ३’ या दोन्ही चित्रपटांमुळे रणदीप भट्ट कॅम्पमध्ये अगदीच लाडका बनला आहे. भट्ट कॅम्पमध्ये मुक्काम ठोकून ‘सीरियल किसर’ बनण्याचा मान पटकावलेल्या इम्रानने काही काळातच अधिक गंभीर आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्या. त्यामुळे भट्ट कॅम्पला अशा नव्या आणि ‘हॉट’ अभिनेत्याचा शोध होताच. पहिल्याच दोन चित्रपटांत सगळ्यांच्याच अपेक्षांवर उतरलेल्या रणदीपकडून सध्या भट्ट कॅम्पच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता रणदीपमध्ये ते पुढील ‘सीरिअल किसर’ शोधत आहेत. पण सूत्रांच्या माहितीनुसार रणदीप काही या सगळ्याबाबत अजिबातच खूश नाही. त्याच्या मते त्याच्या अंगप्रदर्शनापेक्षा त्याच्या अभिनयाची जास्त तारीफ व्हायला हवी. अंगप्रदर्शनामुळे काही काळ लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. पण एक भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी कसदार अभिनयाचे कौतुक होणे गरजेचे आहे, असे त्याने बोलून दाखवले. पण रणदीपची इच्छा असो वा नसो, बॉलीवूडमध्ये जम बसवेपर्यंत तरी त्याला भट्ट कॅम्पमधील आपला तळ भक्कम करण्यावाचून पर्याय नाही.

Story img Loader