गोदा प्रदुषण मुक्त करण्याचा केलेला संकल्प.. गोदा प्रदुषणामुळे आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम. अशा विविध मुद्यांना कॅन्व्हासच्या साथीने रंगसंगतीचा अनोखा अविष्कार साधत ‘हरितकुंभ’ची मांडलेली संकल्पना.. हरित कुंभ समन्वय समिती आणि महापालिका यांच्यातर्फे आयोजित रांगोळी व भित्तीचित्र प्रदर्शनाचे हे वैशिष्ठय़ ठरले.
येथील महात्मा फुले कला दालनात शुक्रवारी सुरूवात झाली. प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते झाले. यावेळी पालिका आयुक्त प्रवीण गेडाम, शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी, शासकीय अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या सरोज जगताप उपस्थित होते. गोदा प्रदुषणाविषयी व्यापक स्वरुपात चर्चा होत आहे. मात्र या गोदावरीला प्रदुषणाच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा आहे. जोवर सर्वसामान्य नागरीक या अभियानात सक्रीय होत नाही, तोवर प्रदुषण मुक्तीचा जागर एकतर्फी होत राहील याची जाणीव त्यांनी करून दिली. डॉ. गेडाम यांनी गोदावरी नदीला प्रदुषण मुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
दरम्यान, प्रदर्शनासाठी कला शिक्षक तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून ‘पर्यावरण प्रदूषण परिणाम व उपाय’ या विषयावर चित्र मागविण्यात आले होते. १२५ हुन अधिक कलाकृती या निमित्ताने प्राप्त झाल्या. त्या या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. अॅक्रेलीक, तैल रंग तसेच रांगोळीचा सुंदर मिलाफ साधत पर्यावरण संवर्धनासाठी विविध संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. आगामी कुंभमेळा डोळ्या समोर ठेवत शहर परिसराचा नवा चेहरा पर्यटकांसमोर यावा यासाठी काय करता येईल याचे प्रतिबिंब प्रदर्शनात उमटले. ‘दक्षिण गंगा की क्षीण गंगा?’, अमृताचा एक थेंब करी मला पावन-प्रदुषणाचा विळखा संपवी माझे जीवन, साधु संत करती स्नान, त्यात टाकु नका घाण, गोदामाईचा राखू मान अशा घोषवाक्यांच्या माध्यमातून गोदा प्रदुषणाविषयी प्रबोधन करण्यात आले. विविध माध्यमातून होणारे गोदावरीसह शहरातील प्रदूषण, प्रदुषण पातळीत होणारी वाढ यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम, वृक्ष तोडीमुळे होणारी जागतिक तापमान वाढ आदींकडे लक्ष वेधण्यात आले. प्रदर्शन ५ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत सुरू राहणार आहे. नाशिककरांनी त्यास आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा