रंकाळा तलाव  प्रदूषणाबाबत प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने शनिवारी झालेल्या विशेष सभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रशासनाच्या निष्क्रिय धोरणामुळे रंकाळा प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करूनही नगरसेवकांना नागरिकांची बोलणी खावी लागतात, अशा शब्दांत सदस्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. अखेर अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी रंकाळा प्रदूषण मुक्तीची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर राहील, महाराष्ट्र दिनापर्यंत रंकाळा प्रदूषणमुक्त करण्यात येईल, अशा शब्दांत सभागृहाला आश्वस्त केल्याने या विषयावरील वादावर पडदा पडला.    
गेल्या काही महिन्यांपासून रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. जागोजागचे सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत असल्याने तलावाच्या प्रदूषणात मोठय़ा प्रमाणात भर पडली आहे. कोल्हापूरचे सौंदर्य असलेला रंकाळा तलाव अलीकडे दुर्गंधीयुक्त वास आणि हिरवट रंग यामुळे कुचेष्टेचा विषय बनला होता. याप्रश्नी अनेक पक्षांनी आंदोलने उभारूनही महापालिकेच्या प्रशासकीय पातळीवरआश्वासनाशिवाय काहीही घडत नव्हते. त्यामुळे रंकाळा तलावाला प्रदूषणमुक्त करण्याबाबत शनिवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.     
सभेस स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण, राजेश लाटकर, शारगंधर देशमुख, प्रा.जयंत पाटील, सुभाष रामुगडे, रवी इंगवले आदी सदस्यांनी रंकाळा प्रदूषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. रंकाळ्याबाबत अनेक तक्रारी होऊनही प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी रंकाळा तलाव हा पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येत होता. गेल्या काही वर्षांत पदमाळा, सरनाईक कॉलनी येथून रंकाळा तलावात सांडपाणी मिसळत असल्याने पाणी प्रदूषणात भर पडली आहे. यापुढे तलावाला प्रदूषित करणाऱ्या घटकांवर जे अधिकारी गांभीर्याने कारवाई करणार नाहीत त्यांना सर्व सदस्यांच्या सहीने घरी बसविण्यात येईल, असा खरमरीत इशारा या सदस्यांनी दिला.     
भूपाल शेटे यांनी रंकाळा तलावातील बोटीचा प्रश्न उपस्थित केला. ४५ लाख रुपये खर्च करून दोन बोटी तलावात फिरत्या ठेवल्यामुळे ऑक्सिजन प्रवाहित होण्याचे काम होणार आहे. या बोटी अद्याप काआल्या नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जलअभियंता मनिष पवार यांनी बोटींचे डिझाईन वेळोवेळी बदलावे लागत असल्याने वेळ लागत आहे, असे सांगून उशीर करणाऱ्या ठेकेदारांची अनामत रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. रंकाळा तलावाभोवतीचे तीन किलोमीटर ड्रेनेजचे काम केले जात आहे. त्यामध्ये अपुरी असलेली कामे १५ एप्रिलपर्यंत करण्यात येतील. १ मेपर्यंत तलावाला प्रदूषित करणारे सर्व घटक रोखण्याची कार्यवाही पूर्ण होईल, असे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.