व्यापाऱ्याचे अपहरण करून चार लाखाची खंडणी वसूल करण्यासाठी मारहाण व दमदाटी केल्यावरून नाशिकरोड पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एका संशयितास अटक करण्यात आली असून खासगी सावकारीतून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणी गणेश शेट्टी यांनी तक्रार दिली आहे. भ्रमणध्वनी रिजार्च करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी आपले नातेवाईक सुकेश अण्णा शेट्टी यांच्यामार्फत सुनील थावराणी व माधव अग्रवाल यांच्याकडून तीन लाख रूपये घेतले होते. हे व्याज देणे अवघड ठरत असल्याने कालांतराने गणेश शेट्टी यांनी कर्जाची परतफेड केली, असे सांगितले जाते. परंतु, काही कालावधीनंतर थावराणी व अग्रवाल यांनी तीन लाख कर्ज व व्याजाचे एक लाख असे चार लाख रूपयांची मागणी केली. कर्जाची परतफेड करूनही संशयितांनी पुन्हा त्यासाठी दमदाटी केली. गेल्या ऑगस्ट महिन्यात गणेश शेट्टी यांना सुकेश शेट्टी, थावराणी व अग्रवाल हे घरातून घेऊन गेले. बेदम मारहाण करून कोरे धनादेश व १०० रूपयांच्या मुद्रांकावर त्यांनी स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. त्यानंतर हे सावकार धनादेश व मुद्रांकाची धमकी देऊन चार लाख रूपये देण्याची मागणी करू लागले. यामुळे वैतागलेल्या शेट्टी यांनी या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सुकेश शेट्टीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
व्यापाऱ्याचे अपहरण करून चार लाखाची खंडणी वसूल करण्यासाठी मारहाण व दमदाटी केल्यावरून नाशिकरोड पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
First published on: 14-10-2012 at 02:08 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ransom police extortion crime kidnap