हिंदी सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर आपल्या आगळ्यावेगळी पद्धतीने संगीतमय प्रेमकथा मांडणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या सिनेमात ‘रोमिओ ज्युलिएट’च्या गोष्टीवर आधारित प्रेमकथा मांडली असली तरी बॉलीवूडचा ‘मेलोड्रामा’ आणि तद्दन गाणी-नृत्याचा भडिमार करणारा फॉम्र्युलाच पुन्हा नव्याने मांडला आहे. नवे काही नाही. भव्यता, पडद्यावरील रंगांची उधळण आणि उत्कट प्रेमाचा भडक आविष्कार दाखविण्याचा प्रयत्न हे वैशिष्टय़ म्हणता येईल.
भन्साळींना भव्यतेचे आकर्षण आहे हे आतापर्यंतच्या त्यांच्या सिनेमातून प्रेक्षकांनी पाहिले आहे. या सिनेमातही सगळे काही भव्य आहे आणि विशेष म्हणजे पडद्यावर सर्वत्र भडक, गडद रंगांचा मुक्त वापर करण्यात आला आहे. संगीतमय प्रेमकथेला अतिशय भडक रंग आणि ढोल-नगारा वाद्यांद्वारे तितक्याच भडक संगीताची जोड दिल्याने सिनेमा अंगावर येतो. प्रेमकथेमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे भीषण आवाज आणि त्यातच कानावर आदळणारे संगीत यामुळेही सिनेमा प्रेक्षकाच्या अंगावर येतो.
रांजडा आणि सनेडा अशा दोन जमातींमधील पूर्वापार वैर आणि संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर या दोन जमातींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राम आणि लीला यांच्यात प्रेम जुळते आणि मग बॉलीवूड मसालापटाप्रमाणे घरच्यांचा आणि समाजाकडून असलेला विरोध, त्यावरून हाणामारी, ‘खूनखराबा’ एवढीच गोष्ट खरे तर आहे. कथानक घडते त्या सिनेमातील काल्पनिक गावात दोन जमातींचे शत्रुत्व इतके पराकोटीचे आहे की या गावात बंदुकी आणि बंदुकीच्या गोळ्या विकण्याची बाजारपेठच आहे म्हणे. घराघरांत, प्रत्येकाकडे भरपूर बंदुका, पिस्तुली, दारूगोळा सारं काही आहे. आनंद व्यक्त करायचा झाला तरी लोक बंदुकीच्या फैरी झाडतात आणि शत्रू जमातीमधील लोकांनी अहंकार दुखावला तर मारायला आणि मरायलाही मागेपुढे पाहत नाहीत असे लोक या गावात राहतात. अर्थात बॉलीवूडी मसाल्याप्रमाणे दोन जमातींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शूरवीर घराण्यांचे आपसांतील वैर आणि जमातींचे पूर्वापार वैर हेही आहेच. या सगळ्याला सिनेमाचा नायक राम याचा मात्र विरोध आहे. त्याला हे वैर मोडायचे आहे. तो रंगेल तरुण आहे, प्रेमाने सर्वाना जिंकता येते, असा त्याचा पूर्वापार रूढ असलेला समज आहे. शत्रू जमातीचे म्होरक्या असलेल्या घराण्यातील नायिका लीलावर रामचे प्रेम जडते. दोघांनाही आपण एकमेकांचे पूर्वापार शत्रू जमातीमधील आहोत हे माहीत असूनही त्यांचे प्रेम जुळते. एकमेकांच्या घरात लपूनछपून भेटणे आणि वरचेवर प्रणय करणे यात राम आणि लीला मश्गूल होत असतात. परंपरागत वैरी असलेले राम आणि लीला एकत्र येऊ नयेत म्हणून दोन्ही जमाती, दोन्ही घराणी रणकंदन माजवतात, अनेकांचे त्यात जीव जातात, पण वैर संपत नाही. आपल्या जमातीचा दुराभिमान आणि आपले वर्चस्व कायम राहावे म्हणून फोफावलेला अहंकार यात आंधळे झालेल्या लोकांना एकत्र आणायचे राम आणि लीला मनोमन ठरवितात. भन्साळींचा सिनेमा असे बिरुद लागलेला त्यांचा हा आणखी एक सिनेमा प्रेमकथा वेगळ्या पद्धतीने मांडतो. ‘आणि ती दोघे सुखाने संसार करू लागली..’ असा ठरीव शेवट मात्र ते करत नाहीत. राम आणि लीला यांचे उत्फुल्ल प्रेम, एकमेकांची अतीव ओढ, परंतु समाजाच्या उंच दगडी आणि पोलादी भिंती तोडून एकत्र येणे अशक्य असल्याची जाणीव झाल्यावर राम आणि लीला एकमेकांशी फटकून वागतात, त्यातून त्यांचे प्रेम दाखविण्याचा दिग्दर्शकाने चांगला प्रयत्न केला आहे.
अति लांबलचक सिनेमा हेही तसे भन्साळी यांच्या सिनेमाचे वैशिष्टय़ ठरते, परंतु या सिनेमात हा लांबलचकपणा अधिकच लांबलचक झाला आहे. भडक पाश्र्वसंगीत आणि गाणी व नृत्यांचा भडिमार याला संकलनाची कात्री लावून सिनेमाची लांबी कमी केली असती तरी दिग्दर्शकाला अपेक्षित असलेला परिणाम साधता आला असता. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची पडद्यावरची सगळी दृश्यं, त्याचे चित्रण पाहण्यात प्रेक्षक रंगून जात असला तरी सतत बंदुकीच्या गोळ्यांच्या फैरींचा आवाज आणि हाणामारी यामुळे रसभंग होतो. सुप्रिया पाठकने साकारलेली बा ही भूमिका लक्षात राहणारी आहे. दोन्ही प्रमुख कलावंतांनी भूमिका चोख बजावल्या आहेत.
गोलियों की रासलीला राम-लीला
निर्माता- संजय लीला भन्साळी, चेतन देऊळकर, किशोर लुल्ला, संदीप सिंग
दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी
संगीत – मॉन्टी शर्मा, संजय लीला भन्साळी
छायालेखन  – रवी वर्मन
कलावंत – दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, सुप्रिया पाठक, शरद केळकर, गुलशन देवय्या, रिचा चढ्ढा, बरखा बिष्ट, अभिमन्यू सिंग, अंशुल त्रिवेदी व अन्य.

Story img Loader