तेरा महिन्यांच्या चिमुकल्या मुलीवर विकृत मनोवृत्तीच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अशीच दुसरी घटना हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकूल वसाहतीत घडली. तीन वर्षांच्या मुलीवर एका वृध्दाने बलात्काराचा प्रयत्न केला. या घटनेची वार्ता पसरताच संतप्त जमावाने पोलीस ठाणे व छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. तसेच अन्य काही भागातही गोंधळ माजवून दगडफेकीचे प्रकार घडले. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
गेल्या आठवडय़ात शहरातील फक्रुद्दीन झोपडपट्टीत एका तेरा महिन्यांच्या चिमुकल्या मुलीवर शेजारच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्याचे पडसाद उमटून आंदोलनही करण्यात आले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा अशाच स्वरूपाची संतापजनक घटना हैदराबाद रस्त्यावरील म्हाडाच्या विडी घरकूल वसाहतीत घडल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी राधेश्याम किसन येमूल (वय ६१) या वृध्दाने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल झाली. येमूल यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, येमूल यास न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यास १९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तथापि, या घटनेची वार्ता शहरात पसरली आणि संतप्त जवाव एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर एकत्र आला. नंतर आरोपी येमूल यास सुरक्षितता म्हणून जेलरोड पोलीस ठाण्यातील कोठडीत हलविण्यात आले. तेव्हा संतप्त जमाव जेलरोड पोलीस ठाण्यासमोरही एकत्र आला. तर छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयात सदर पीडित बालिकेला वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले असता त्याठिकाणी जमाव गोळा झाला. या जमावाने गोंधळ घालत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. दरम्यान, या घटनेच्या पाश्र्वभूमीवर विजापूर वेस, बेगम पेठ, किडवाई चौक, जिदाशा मदार चौक आदी भागात जमावाने संतप्त होऊन दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करून जमावाला पांगवावे लागले. या घटनेमुळे या भागात बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून या घटनेला जातीय रंग चढणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे. विशेषत: नवरात्रौत्सव व बकरी ईद हे दोन्ही सण तोंडावर येऊन ठेपले असताना शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनावरील जबाबदारीही वाढली आहे. याच अनुषंगाने सोमवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयात शांतता समितीची बैठक आयोजिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape attempt on three year old girl