बलात्कार केलेल्या आरोपीला एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून मोकळीक दिली जात असल्याचा आरोप गवळीवाडा (विळद घाट) येथील काही ग्रामस्थांनी आज केला. जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांनी याबाबतचे निवेदन दिले.
हरिभाऊ केशव आंबेकर (रा. विळद, तळ्याजवळ) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. संबंधित महिलेची वैद्यकीय तपासणी झालेली असून घटनेचे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दत्तात्रय हिरणवाळे, प्रकाश गायकवाड, महादू नागापुरे, शंकर बारसे, सोनाप्पा नारायण हातरूणकर, प्रविण गडाप्पे, राधाप्पा नागापुरे, गोपीनाथ बारसे, अनिल पठारे आदींनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्वरित कारवाई झाली नाही तर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या परिसरात आरोपी मोकळा फिरत आहे. त्याने व त्याच्या नातेवाईकांनी संबंधित महिला, तिचे कुटुंबीय यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. त्या महिलेच्या मागे थांबून तिला मदत करणाऱ्यांनाही त्यांच्याकडून धोका आहे. पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला पकडण्याबाबत निवेदन दिले. भेट घेतली, मागणी केली, मात्र आरोपी फरार आहे याशिवाय त्यांच्याकडून काहीही सांगितले जात नाही. प्रत्यक्षात आरोपी गावात फिरतो आहे, माझे कोणी काही करू शकत नाही असे सांगतो आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली.
दरम्यान, हा सर्व परिसर डोंगराळ आहे. तिथे पोलीस गस्त सुरू होण्याची गरज आहे. अनेक गुंड, दारूडे, मोकळे फिरत असतात. त्यांनी वस्तीवरच्या सामान्यांना जगणे मुश्किल केले आहे. लहानमोठय़ा चोऱ्या करणे, महिलांची, मुलींची छेडछाड करणे, गुरे चारायला नेणाऱ्या महिलांवर पाळत ठेवून त्यांना त्रास देणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशा गुंडांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस त्यांना पाठिशी घालतात व सामान्यांना त्रास देतात, असेही या ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना सांगितले. हे सर्व प्रकार बंद करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, त्यांच्या कामात सुधारणा झाली नाही तर बेमुदत उपोषण सुरू करू, असे त्यांनी म्हटले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा