दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे पडसाद देशभर उमटत असतानाच शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना जलालखेडय़ात घडली. गेल्या आठवडय़ात एका शिक्षकाने बलात्कार केल्याच्या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून जलालखेडा पोलिसांनी या शिक्षकाला बुधवारी रात्री उशिरा अटक केली. श्रीकांत हरिहर फोफसे (रा. अंबाडा) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जिल्हा परिषदेत तो तासिकेप्रमाणे शिकवायला जात होता. त्याच्या वागणुकीबद्दल तक्रारी येऊ लागल्याने शाळेच्या व्यवस्थापन समितीने त्याला काढून टाकले. त्याच्या वडिलांनी अधिकाराचा वापर करीत एका खाजगी शाळेत त्याला शिक्षकाची नोकरी लावून दिली. १९ डिसेंबरला त्या शाळेतील आठव्या वर्गार्ची विद्यार्थिनी दुपारी घरी जेवणास गेली. जेवून दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास ती शाळेत परत जात होती. रस्त्यात श्रीकांतला ती दिसली. आजूबाजुला कुणी नसल्याचे पाहून त्याने तिला उचलले. एका घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. सायंकाळपर्यंत त्याने तिला तेथे कोंडून ठेवले. शाळा सुटल्यानंतर त्याने तिला सोडले. ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
घरी गेल्यानंतर तिने ही बाब तिच्या आईला सांगितली. बदनामीच्या भीतीने ती चूप राहिली. मंगळवारी आरोपीने त्या विद्यार्थिनीला पुन्हा धमकावत पाचारण केले. त्या विद्यार्थिनीने तिच्या वडिलांना ही बाब सांगितली. त्यांनी काल सायंकाळी जलालखेडा पोलीस ठाणे गाठले. प्रभारी ठाणेदारांनी मुलगी व तिच्या आई-वडिलांना उपविभागीय पोलीस अधिकारी स्मिता नागणे यांच्याकडे नेले. त्यानंतर त्यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. रात्री आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.