राज्यातील साडेतीन पिठांपैकी एक उपपीठ असणाऱ्या राशीन येथील जगदंबा देवीच्या मंदिरात घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली आहे.
राशीन येथे माहूरगडची यमाई माता व तुळजापूरची तुकाई माता यांचे एकत्र मंदिर आहे. पेशवेकालीन असे हे मंदिर राशीन येथील आकोबा स्वामी शेटे जंगम यांनी बांधले. मंदिरात पंचधातूच्या सुंदर मूर्ती आहेत. या ठिकाणी नवरात्रात मोठी गर्दी होते. नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्य़ांच्या सरहद्दीवर असलेल्या या देवस्थानाच्या दर्शनासाठी राज्य-परराज्यातून भाविक येतात.
सकाळी साडेनऊ वाजता मंदिरात घटस्थापना होणार आहे. आकोबा स्वामी जंगम शेटे यांचे वंशज व रेणूकर पुजारी हे घटस्थापना करतात. नंतर शेटे जंगम स्वामी देवीला महाअभिषेक करतात. राशीन येथील ग्रामज्योतीष संदीप सागडे मंदिरात देवी सप्तशतीचा पाठ नऊ दिवस सांगतात. नवरात्रोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती ट्रस्ट, ग्रामपंचायत व पुजारी यांच्या वतीने देण्यात आली. शांतता कमेटीची बैठकदेखील घेण्यात आली आहे. राशीन परिसरात दहा दिवस अतिशय भक्तिपूर्ण वातावरण नवरात्रोत्सव साजरा होतो.