तिम लढतीच्या उद्देशाने अंगाला तेल चोपडून भारदस्त व्यक्तिमत्वाच्या पहिलवानाने तयारी करावी, आणि रंगीत तालमीतच त्यास धोबीपछाड मिळाल्यावर सर्वाना धक्का बसणे साहजिकच. पहिलवानाने तयारी भरभक्कम केली होती. मग असे काय घडले की, शिडातील हवा अचानक गुल व्हावी आणि गलबताने जलसमाधी घ्यावी. उत्तर महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास राष्ट्रवादीची अवस्था यापेक्षा वेगळी झालेली नाही. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या गेलेल्या या निवडणुकीत आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अक्षरश: पानिपत झाले. पाच पैकी तीन पालिकांवर वर्चस्व प्रस्थापित करत काँग्रेसने त्यांचे मनसुबे उधळून लावले. दुसरीकडे, नाशिकच्या इगतपुरीमध्ये शिवसेनेने सत्ता कायम राखली तर सिंहस्थामुळे प्रकाशझोतात आलेल्या त्र्यंबकेश्वर पालिकेत मनसेदय झाला. म्हणजे नाशिक ते नंदुरबापर्यंतच्या पट्टय़ात राष्ट्रवादीला कुठेही लक्षणीय कामगिरी नोंदविता आलेली नाही.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, तळोदा व नवापूर पालिकेत काँग्रेसने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला. त्यात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढणाऱ्या प्रभावास लगाम घालण्यात काँग्रेसजन यशस्वी झाले. मतपेटीतून बाहेर आलेले निकाल राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे. राज्यात मित्रपक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तासुख घेत असले तरी नंदुरबारमध्ये उभय पक्षांतील नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. काही वर्षांपूर्वी आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद मिळाल्यानंतर डॉ. विजयकुमार गावित यांनी मुक्तहस्ते सवलतींची उधळण करत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यास खिंडार पाडण्याचे काम आरंभिले होते. त्यात ते काहीअंशी यशस्वी झाले. राष्ट्रवादी वाढण्यास डॉ. गावितांकडील केवळ आदिवासी खाते हेच कारणीभूत असल्याचे लक्षात आल्यावर मंत्रिमंडळातील खाते बदलात डॉ. गावितांकडे हे खाते कायम राहणार नाही, याची काळजी काँग्रेसने घेतली. परिणामी नंदुरबारमध्ये योजनांच्या निमित्ताने जी खैरात सुरू होती, ती बंद झाली. दुसरीकडे मिळालेल्या वैद्यकीय शिक्षण खात्याचा उपयोग करून घेत डॉक्टरांनी गावोगावी आरोग्य शिबिरे घेऊन मुलगी डॉ. हिना यांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. नगरपालिका निवडणुकीपूर्वी खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नंदुरबारमध्ये युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याद्वारे शक्तीप्रदर्शनही केले. इतकी सर्व तयारी करूनही पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
नंदुरबार व नवापूर पालिकेत अक्षरश: एकेका जागेसाठी राष्ट्रवादीला झगडावे लागले. तळोदा पालिकेत पक्षाचे अस्तित्वच शिल्लक राहिले नाही. याउलट काँग्रेसने शांतपणे प्रचार करून राष्ट्रवादीला, म्हणजेच प्रामुख्याने डॉ. गावितांना काँग्रेसची ताकद दाखवून दिली. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, खा. माणिकराव गावित, आ. पद्माकर वळवी, माजीमंत्री सुरूपसिंग नाईक यांनी भविष्यातील धोका लक्षात घेऊन केलेले नियोजन यशस्वी ठरले. डॉ. गावित यांनी जिल्ह्यातील सर्व महत्वपूर्ण पदे आपल्या घरात राखत घराणेशाही सुरू केल्याचा काँग्रेसजनांनी पद्धतशीरपणे प्रचार केला. त्यात फारसे काही वावगेही म्हणता येणार नाही. कारण, डॉ. गावितांची पत्नी कुमुदिनी या जिल्हा परिषद अध्यक्षा तर भाऊ शरद गावित हे नवापूरची आमदारकी भूषवित आहेत. एक बंधू जिल्हा परिषद सदस्य असून एक भाऊ आमदारकीच्या अन् मुलगी खासदारीच्या तयारीत आहे. ही एकूणच स्थिती काँग्रेसने मतदारांच्या गळी उतरविली. डॉ. गावितांच्या धोरणामुळे खुद्द राष्ट्रवादीचे अन्य इच्छुक पदाधिकारी व कार्यकर्तेही नाराज होतेच. त्यात डॉ. गावित नेमस्त स्वभावाचे असले तरी त्यांचे बंधू आ. शरद हे मात्र उद्धट स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्याचाही फटका नवापूर पालिकेत राष्ट्रवादीला सहन करावा लागला. या सर्वाचा परिपाक पालिकेत राष्ट्रवादी भूईसपाट होण्यात झाला. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीला असे धक्के सहन करावे लागले असताना नाशिक जिल्ह्यातील निवडणुकीत काही अंशी का होईना हा पक्ष तग धरू शकला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे कमालीचे महत्व आलेल्या त्र्यंबक पालिकेत सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ होती. त्यात कोणालाही पूर्ण यश मिळाले नसले तरी मनसे सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरला. सत्ता स्थापनेसाठी त्यांना अपक्ष व सेना-भाजपची मदत मिळण्याची शक्यता असली तरी राष्ट्रवादीने चमत्कार घडविण्याची तयारी ठेवली आहे. भाजपचे प्राबल्य राहिलेल्या या पालिकेत विरोधी पक्ष कधी अस्तित्वात नव्हता. भाजपची सत्ता असतानाही विरोधक सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेत राजकारण करीत असत. या निवडणुकीने पालिकेत प्रथमच विरोधकही स्थानापन्न होतील. ईगतपुरी पालिकेत सलग पाचव्यांदा सत्ता हस्तगत करण्यात शिवसेनेला यश मिळाले. संपूर्ण जिल्ह्यात सेनेची वाताहत होत असताना ही कामगिरी उल्लेखनीय म्हणता येईल. संजय इंदुलकर यांचे नियोजन, रिपाइं व काँग्रेसमधील बंडखोरी सेनेच्या पथ्यावर पडली. उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसने सरस कामगिरी केली असली तरी या ठिकाणी त्या पक्षास उमेदवार मिळणे अवघड झाले होते.
गेल्या महिन्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी नंदुरबार जिल्ह्यात पक्षाच्या कामाबद्दल डॉ. गावित यांचे तोंड भरून कौतुक करताना त्यांचा आदर्श घेण्याचा सल्ला धुळ्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला होता. पालिकेच्या निकालामुळे खुद्द पवारांसह राष्ट्रवादीच्याही भ्रमाचा भोपळा फुटला असेल.
राष्ट्रवादीचा भ्रमाचा भोपळा
तिम लढतीच्या उद्देशाने अंगाला तेल चोपडून भारदस्त व्यक्तिमत्वाच्या पहिलवानाने तयारी करावी, आणि रंगीत तालमीतच त्यास धोबीपछाड मिळाल्यावर सर्वाना धक्का बसणे साहजिकच. पहिलवानाने तयारी भरभक्कम केली होती.
First published on: 09-11-2012 at 11:46 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtravadi feature