‘आदर्श’वादाची झूल पांघरून काँग्रेसचे या भागातील नेतृत्व आर्थिक ताकदीच्या बळावर राजकारण करतात. परंतु कोणतेही पाठबळ नसताना ‘त्या’ नेतृत्वाला आव्हान देण्याचे काम प्रताप पाटील यांनी केले. त्यांच्यासारख्या संघटन कौशल्य व विकासाची जाण असणारे नेतृत्व राष्ट्रवादीत आल्याने पक्षाला मराठवाडय़ात बळकटी मिळेल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त लोहा येथे आयोजित जाहीर मेळाव्यात पवार बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, गृहमंत्री आर. आर. पाटील, उच्चशिक्षण मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, कमलकिशोर कदम, शिवाजी माने, गंगाधरराव कुंटूरकर, सतीश चव्हाण, जयप्रकाश दांडेगावकर, प्रदीप नाईक, विनायक मेटे, सुरेश वरपूडकर, रामनारायण काबरा यांची उपस्थिती होती.
पवार म्हणाले की, नांदेड जिल्ह्य़ातले नेतृत्व आर्थिक बळावर दबावाचे राजकारण करीत आहे. परंतु सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आमचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विकासाचे काम करीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस चिखलीकरांच्या मागे पूर्ण ताकदीनिशी उभा राहणार असल्याचे सांगत या भागातील अपूर्ण व प्रलंबित कामे चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले.
गृहमंत्री पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत चिखलीकरांची उमेदवारी काँग्रेसच्याच या भागातील नेतृत्वाने कापली. पण आता चिखलीकरांच्या मागे राष्ट्रवादीची ताकद आहे. केवळ नियमावर बोट ठेवून कामे होत नाहीत. मंत्रालय जळाल्यानंतर तेथील राख दूर झाली. पण दुरुस्ती अद्याप बाकी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांच्या शैलीवर टोला लगावला. पिचड, टोपे, पाटील, कदम यांचीही या वेळी भाषणे झाली.
प्रास्ताविकात प्रताप पाटील चिखलीकर यांनी विलासराव देशमुख यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. लोहा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त करताना पक्षाचा आदेश अंतिम मानू, तसेच पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. प्रताप पाटील चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश राठोड, नगराध्यक्ष किरण वट्टमवार आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.
निमंत्रणपत्रिकेत नाव असूनही कंधारचे आमदार शंकरअण्णा धोंडगे मेळाव्याला अनुपस्थित होते. सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले. नगरसेवक जफ रोद्दीन शेख यांनी आभार मानले.

Story img Loader