मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन यांना शहराच्या इतर भागांशी जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा पारिख पुलाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाच्या लक्ष वेधण्यासाठी बुधवारी भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महापालिकेचे उपअभियंता संजय देशपांडे यांनी आठवडाभरात पुलाखालील रस्ता डांबरीकरण व ड्रेनेजचे काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले.    
पारिख पुलाखालील रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी नेहमीच वाहत असते. पावसाळ्यात तर ते गुडघाभर साचलेले असते. येथील गटारीवर झाकण नसल्याने वाहनांचे अपघात होत असतात. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. पुलाखालून दररोज हजारो नागरिक ये-जा करीत असतात. पुलाची दुरवस्था झाली असून महापालिकेचे दुर्लक्ष आहे. या सर्व बाबींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनात भाजपाचे शहराध्यक्ष महेश जाधव, सुरेश जरग, विजय जाधव, प्रकाश लोहार, प्रमोद पंडित, प्रतेश भोसले, सतीश कांबळे, भारती जोशी, अमिता मंत्री आदी सहभागी झाले होते. रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून पुलाची दुरवस्था झाली असल्याचे निदर्शनास आणून द्यावे, अशी मागणी महेश जाधव यांनी उपअभियंता देशपांडे यांच्याकडे केली. पुलाखाली वीजव्यवस्था करण्यात यावी. तसेच रात्रीची लुटमारी रोखण्याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या.

Story img Loader