कोपरगांव तालुक्याच्या हक्काच्या अकरा टीएमसी पाण्यासाठी येत्या गुरूपौर्णिमेच्या दिवशी सोमवार २२ जुल रोजी नगर-मनमाड महामार्गावर श्रीसाईबाबा चौफुली कोपरगांव येथे सकाळी साडेनऊ वाजता सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, गोदावरी कालवे सर्वपक्षीय पाटपाणी संघर्ष समितीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे व आमदार अशोकराव काळे, संजीवनीचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
गोदावरी कालवे सर्वपक्षीय पाटपाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांव तालुक्याच्या बिकट झालेल्या पाटपाण्यांच्या प्रश्नांवर शनिवारी सकाळी ११ वाजता येथील गोदावरी डाव्या तट कालव्याच्या विश्रामगृहावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बठक बोलाविली होती. त्यात या प्रश्नांवर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची सांगोपांग चर्चा होऊन वरील निर्णय एकमुखाने जाहीर करण्यांत आला.
सर्वपक्षीय पाटपाणी संघर्ष समितीचे सभापती मिच्छद्र केकाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष अॅड. नारायण काल्रे, कोसाकाचे ज्येष्ठ संचालक लहानूभाऊ नागरे, संजीवनीचे उपाध्यक्ष विलासराव वाबळे, कोसाकाचे संचालक कारभारी आगवण, सोमनाथ चांदगुडे, भाजपाचे माजी सरचिटणीस, वंदेमातरम संघटनेचे अध्यक्ष विजय वहाडणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शिवसेनेचे अनिल सोनवणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सदुबाबा शेख, राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत िशदे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, शहराध्यक्ष काका श्खो, रिपाईचे जिल्हा नेते दीपक गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव सरोदे, शहराध्यक्ष दिलीप दारूणकर, संजीवनीचे उपाध्यक्ष विलासराव वाबळे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर, राहाता तालुका भाजपाचे नितीन कापसे, राहाता तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय जाधव, संजीवनीचे संचालक विश्वासराव महाले, अरूणराव येवले, बाळासाहेब वक्ते, यांच्यासह राहाता व कोपरगांव तालुक्यातील लाभधारक शेतकरी, प्रमुख पदाधिकारी, कार्यकत्रे मोठया संख्येने हजर होते.
कोपरगांव तालुक्यावर हक्काच्या पाटपाण्यांच्या प्रश्नावर गेल्या पंचवीस वर्षांपासून नेहमीच अन्याय होत असून तो या कार्यक्षेत्रातील लाभधारक शेतकरी सहनही करीत आलेले आहेत. मात्र, आता राज्यातील आघाडी शासन ज्येष्ठनेते शंकरराव कोल्हे यांच्या वारंवार हक्काच्या केलेल्या अकरा टीएमसी पाण्यासाठी केलेल्या मागण्या धुडकावित आहे. तरीही ८४ वष्रे वय असतांनाही त्यांनी कुठलीही कच न खाता या प्रश्नावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची मोट बांधत याप्रश्नी लढा देण्याचे ठरविले आहे; त्याचे पहिले पाऊल म्हणून गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर त्यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेनऊ वाजता श्रीसाईबाबा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे या प्रश्नावर बोलताना म्हणाले की, गोदावरी कालव्यांच्या पाण्यासाठी राजकीय दबावतंत्र अवलंब, सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांचा जनरेटा आणि सनदशीर मार्गाने न्यायालयीन लढा, या तीन तंत्रांचा अवलंब केला तरच हा प्रश्न सुटेल, त्यासाठी धोरण आखावे.
आमदार अशोकराव काळे म्हणाले की, कोपरगांव तालुक्याच्या हक्काच्या अकरा टीएमसी पाण्याचा सिन्नर येथील मेगाथर्मल पॉवर इंडिया बुल्स् या कंपनीला सांडपाण्याच्या नावाखाली साडेचार टीएमसी पाणी व शासनातील पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी विसंगत आकडेवारी या दोन कारणांमुळे विचका झाला आहे. सन २००८ मध्ये उच्चाधिकार मंत्री समितींने इंडिया बुल्स् कंपनीला पाणी देण्याची परवानगी दिली. २०११ मध्ये शासनाने पाण्याचा प्राधान्यक्रम बदलला आणि सन २०१२ मध्ये इंडिया बुल्स् कंपनीबरोबर शासनाने करार केला. वास्तविक त्याचवेळी शासन हा करार नाकारू शकत होते पण तसे झाले नाही. शासनापेक्षा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ मोठे नाही. स्व. माजी खासदार शंकरराव काळे यांनी हक्काच्या पाटपाण्याबाबत थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागितली व त्याप्रमाणे निकाल लाऊन घेतले, पण शासन त्या निकालाची अंमलबजावणी राबवित नाही, ही खेदजनक बाब आहे. सरकारी धोरणही चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
ज्येष्ठ संचालक लहानुभाऊ नागरे म्हणाले की, येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोटतिडकीच्या पाण्याच्या प्रश्नांवर हे सरकार गंभीर नाही. किरकोळ जामीन मिळविण्यासाठी एकीकडे वीस-वीस वकील न्यायालयात लावले जातात. येथे मात्र 2 हजार कोटींचे नुकसान होत असतांना आम्हां शेतकऱ्यांची बाजू न मांडता वाऱ्यावर सोडण्याचे कारस्थान केले जात असल्याची टीका केली. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र जाधव म्हणाले की, ब्रिटिशांनी या अवर्षणग्रस्त तालुक्याला न्याय दिला, पण आता हे शासन शेतकऱ्यांचे गळे घोटण्यास निघाले आहे. मागील हंगामात आम्ही सुप्तावस्थेत असल्याने पाणी गेले; तेंव्हा आतातरी जागे व्हा.
ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे या प्रसंगी बोलताना म्हणाले की, गेल्या साठ वर्षांत गोदावरीचे कालवे भर पावसाळयात बंद पडले आहेत, असे कधी झाले नाही. ते यावर्षी औरंगाबादच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने करून दाखविले व आमचे पाणी बंद करून समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली हे पाणी जायकवाडीत नेले व आजही गोदावरी नदीपात्रातून आमच्या डोळयादेखत पाणी सोडले जाते. हे आगामी काळात कोपरगांव तालुक्याच्या दृष्टींने मोठे षडयंत्र आहे. त्यामुळे आम्ही आता रास्तारोको, जेलभरो, रेलरोको अशा माध्यमांतून, वेळ पडल्यास मंत्रालय, विधिमंडळावर शेतकऱ्यांचा मोर्चा, मंत्र्यांना गावबंदी, आदि माध्यमांतून आम्ही आंदोलने करणार असल्याचे या वेळी जाहीर केले.
इंडिया बुल्सला आघाडी शासनाने पाणी दिल्याचा आरोप करून त्याविरूध्द तुम्ही बोलणार नसाल तर आपल्याला यित्कचतही न्याय मिळणार नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी इंडिया बुल्स् कुणाची कंपनी आहे प्रथम जाहीर करावे, अगोदर त्यांचे पाणी बंद करा व आमचे हक्काचे पाणी आम्हांला द्या, अशी मागणी भाजपाचे विजय वहाडणे यांनी केली.
तालुका उजाड होत असतांना आपल्या दोन पिढया संपल्या, आता तिसऱ्या पिढीचे भवितव्य अधांतरी आहे, आमचे जे काय होईल ते होवो, मात्र शासनच आमच्या विरोधात वागत असेल तर काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे त्यांच्या तोंडावर फेकून देऊ, असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यावतींने गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र परजणे यांनी जाहीर केले.
नगर- मनमाड मार्गावर सोमवारी रास्ता रोको
हक्काच्या अकरा टीएमसी पाण्यासाठी सोमवार २२ जुल रोजी नगर-मनमाड महामार्गावर श्रीसाईबाबा चौफुली कोपरगांव येथे सकाळी साडेनऊ वाजता सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.
First published on: 21-07-2013 at 01:55 IST
TOPICSरास्ता रोको
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasta roko agitation on nagar manmad road on monday