मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सोमवारी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी महाराष्ट्र व कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले.    
मराठा समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. या प्रश्नी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. राज्य शासनाच्या वेळकाढू भूमिकेचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हाध्यक्ष राजू सावंत, बाबा महाडिक, भरत पाटील आदींच्या नेतृत्वाखाली शंभरावर कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गावर जमले. मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीच्या घोषणा देत आंदोलकांनी रास्ता रोको केला. काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलन सुरू असताना तेथून जाणारी राज्य परिवहन महामंडळाची एक एसटी अडविण्यात आली. चालकाच्या बाजूला असलेल्या काचेवर दगड मारून ती फोडण्यात आली. असाच प्रकार रुईकर कॉलनी येथे कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या एसटीबाबत घडला. या एसटीच्या मागील बाजूच्या काचा फोडण्यात आल्या.     
सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनस्थळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. एसटीवर दगड फेकणाऱ्या एका कार्यकर्त्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला सोडण्याची मागणी आंदोलकांनी केली. पण पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर आंदोलक जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेले. मात्र ते अनुपस्थित असल्याने तहसीलदार वर्षां सिंगन-पाटील यांना निवेदन देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा