वरच्या धरणातून जायकवाडी जलाशयात पाणी सोडावे, या मागणीसाठी बुधवारी शिवसेनेच्या वतीने जिल्ह्य़ातील शहागड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे बीड-औरंगाबाद मार्गावरील वाहतूक तासभर बंद पडली होती.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर व ए. जे. बोराडे, आमदार संतोष सांबरे, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, बाबासाहेब इंगळे आदींसह शिवसैनिकांनी आंदोलनात भाग घेतला. रास्ता रोकोच्या ठिकाणी येऊन अंबडच्या तहसीलदारांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडीच्या वरच्या भागातील गंगापूर धरणात ९१ टक्के जलसाठा झाला आहे. दारणा ८५ टक्के, करंजवण ८२, पालखेड ५४, गौतमी ८६, कश्यपी ८१, मुकणे ६१, नांदूर मधमेश्वर ९१, भंडारदरा १००, मुळा ६५, निळवंडे ६७, धावनी ९९, वाघाड १००, ओझरखेड ४३ व पालखेड ५४ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा आहे. परंतु जायकवाडीने आता कुठे जोत्याची पातळी गाठली असून उपलब्ध जलसाठा फक्त ४८२ दशलक्ष घनमीटर (२२ टक्के) आहे. जायकवाडीच्या वरच्या भागात नियमबाह्य़ रीतीने अधिक पाणी अडविण्यात येत आहे. त्यामुळे जालन्याच्या अंबड व घनसावंगी तालुक्यांतील गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. वरच्या धरणातून जायकवाडीत त्वरित पाणी सोडावे, तसेच औरंगाबाद-सोलापूर व वडीगोद्री-भोकरदन रस्त्याचे चौपदरीकरण करावे, भारनियमन रद्द करून सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी, सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग टाकावा, अंबड-घनसावंगी तालुक्यांतील गोदावरी काठचे रस्ते तयार करावेत, पीकविम्याची रक्कम तातडीने द्यावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा