कराडनजीकच्या ओगलेवाडी परिसरातील विरवडे, हजारमाची, राजमाची, बाबरमाची, वाघेरी, पाचुंद, मेरवेवाडी, करवडी, कामथी या गावांसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत असणारे जानाई तसेच मेरवेवाडी तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे या तलावांमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करीत कराड-विटा मार्गावर ओगलेवाडी येथे संबंधित गावातील जनता एकत्र जमून रस्त्यावर उतरली. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणबाजी करीत त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले. अॅड. चंद्रकांत कदम, किशोर पाटील, विश्वास पाटील, संपत पाटील, विश्वास सुर्वे, अन्सार पटेल यांच्यासह परिसरातील विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी, तसेच ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.
ओगलेवाडी विभागातील टंचाईग्रस्त दहाही गावांचे ग्रामस्थ जानाई तसेच मेरवेवाडी येथील बंधाऱ्यांमधील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी व शेतीसाठी करीत असतात. परंतु अपुऱ्या पावसामुळे हे दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरू शकले नसल्याने हे दोन्ही तलाव सध्या पाण्याअभावी कोरडे ठणठणीत पडले आहेत.
या बंधाऱ्यांमध्ये जवळूनच जात असणाऱ्या टेंभू योजनेचे पाणी या दोन्ही तलावात सोडल्यास पावसाळा सुरू होण्याअगोदर ग्रामस्थांच्या पाण्याची सोय होऊ शकते. याबाबत अनेकवेळा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली असली तरी त्याची दखल घेण्यात आलेली नाही. तरी प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी संबंधित गावांमधील ग्रामस्थांनी एकजुटीने न्याय मिळविण्याची भूमिका घेतली आहे.