पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीतील उभ्या पिकांसाठी दारणा, गंगापूर धरणातून आवर्तन मिळावे या मागणीसाठी आज सकाळी शहरातील नगर-मनमाड रस्त्यावर शिवाजी चौकात तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवत दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवली.
राहाता परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यामुळे जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतातील उभ्या पिकांसह हजार एकर फळबागा पाण्याअभावी जळून खाक झाल्या आहेत. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाण्याचे झालेले नियोजन अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे फसले आहे. शेतीसाठी एक आवर्तन सोडावे पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून साठवण तलाव भरावे आदी मागण्या करण्यात आल्या. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांमुळेच गोदावरी कालव्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडले, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांनी केली.
यावेळी अ‍ॅड. रघूनाथ बोठे, नगराध्यक्ष कैलास सदाफळ, भाजपचे जेष्ठ नेते गंगाधर चौधरी, मोहनराव सदाफळ, फकीरा लोढा, भाऊसाहेब सदाफळ, बाबासाहेब गुळवे यांची भाषणे झाली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र आंदोलनाकडे पाठ फिरविली.