लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाच्या मागणीवरून जिल्ह्य़ातील राजकीय हवा तापू लागली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह भाजप व विविध पक्षांच्या संघटनाही रस्त्यावर उतरत असल्यामुळे या मागणीला नेमका विरोध तरी कोणाचा, असे संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. सर्वाचेच समर्थन असताना राजकीय नेतेमंडळी मात्र या भावनिक मुद्याआडून निवडणुकीत मतांची पोळी भाजण्याचा डाव खेळत एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी साधत असल्याचे दिसते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जिल्हय़ात मागील महिन्यापासून राजकारण तापू लागले आहे. राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी आरक्षण परिषद घेऊन ओबीसींच्या स्थानिक नेत्यांवर शरसंधान केले. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी तर मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला आधीपासूनच पािठबा असल्याचे पत्रकार बठकीत जाहीर केले. भाजपतर्फे माजलगांव येथे प्रदेश सरचिटणीस आर. टी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाजप रस्त्यावर उतरल्याने खडबडून जागे होत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी दुसऱ्याच दिवशी याच मागणीसाठी माजलगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. बहुतेक मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचे मतदार बहुसंख्येने असल्यामुळे सर्वच मंत्री व आमदार या मागणीवर सोयीने राजकारण करू लागल्याचे लपून राहिलेले नाही. मराठा समाजाच्या विविध संघटनांनी या मागणीसाठी राजकीय दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली छावा संघटनेने शहरात मोठी परिषद घेऊन सरकारला इशारा दिला. ओबीसींचे नेते जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे जि. प.चे शिक्षण व आरोग्य सभापती संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण कृती समिती स्थापन करण्यात आली. मांजरसुंबा येथे या समितीने ५ हजार लोकांचे मोठे रास्ता रोको आंदोलन केले. याच वेळी राष्ट्रवादीअंतर्गत क्षीरसागर विरोधी गटही खडबडून जागा झाला. माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र समिती स्थापन करून अंबाजोगाई येथे रास्ता रोको करण्यात आले. क्षीरसागर विरोधी सर्वाना एकत्र घेऊन केलेल्या आंदोलनात शिवाजीराव पंडित यांनी मात्र थेट गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका करुन या आंदोलनाला राजकीय वळण दिले.
लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून पंडित यांचे चिरंजीव आमदार अमरसिंह हे उमेदवारीचे दावेदार मानले जातात. या पाश्र्वभूमीवर आरक्षण समितीच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी शिवाजीराव पंडित रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा पालवे यांनी मंगळवारी वडवणीत रास्ता रोको करुन आपणही मागे नसल्याचे दाखवून दिले. शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनीही नव्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा समाज शेतकरी व कष्टकरी असल्यामुळे या समाजाला आरक्षण मिळावे, ही मागणी अनेक वर्षांपासून केली जाते. मात्र, सत्तेत याच समाजाचे लोक वर्षांनुवष्रे प्रतिनिधित्व करीत आहेत. विरोधकही आरक्षणाच्या मागणीला जाहीर पािठबा देत आहेत. असे असले तरी मागणी मात्र पूर्ण होत नाही, हे वास्तव आहे. निवडणुकांच्या तोंडावर आरक्षणाची मागणी पेटवली जाते व एकगठ्ठा मते खेचण्याचा प्रयत्न होतो, हेही उघड सत्य आहे. या पाश्र्वभूमीवर लोकसभेच्या बीड मतदारसंघातील निवडणूक लक्षात घेऊन दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सोयीनुसार आरक्षणाच्या मागणीआडून मतांची पोळी भाजण्याचा डाव खेळला जात आहे.
मराठा आरक्षणासाठी भाजपचे ‘रास्ता रोको’
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वडवणी येथील शिवाजी चौकात भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा पालवे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी २ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी आमदार केशव आंधळे, आर. टी. देशमुख, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सुधीर िशदे या प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठय़ा संख्येने लोक यात सहभागी झाले होते. आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वच पक्षांचे नेते, कार्यकत्रे, विविध संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत असल्याने जिल्हय़ात मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला आहे.
आरक्षणाच्या पडद्याआड कुरघोडय़ांचे नाटय़ रंगले!
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जिल्हय़ात मागील महिन्यापासून राजकारण तापू लागले आहे. वडवणी येथील शिवाजी चौकात भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा पालवे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी २ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
First published on: 25-09-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasta roko for reservation in beed