प्रतापगड येथील अफजल खानाच्या कबरीभोवती असलेले अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्याच्या प्रयत्नात असणारे सुमारे १००हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना जिल्हय़ात जमावबंदीचा आदेश लागू असल्याचे कारण दाखवून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र पोलीस आंदोलन दडपून काढत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत आंदोलकांनी राज्य शासन याप्रश्नी निष्क्रिय राहात असल्याबद्दल आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.
अफजल खानाच्या कबरीभोवती असलेले अतिक्रमण काढून टाकण्यात यावे, या मागणीसाठी राज्यातील हिंदुत्ववादी संघटनांचा पाठपुरावा, तसेच आंदोलन सुरू आहे. याच मागणीसाठी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कार्यकर्ते तावडे हॉटेल जवळ जमले होते. तथापि तेथे पोहोचलेल्या गांधीनगर पोलिसांनी जिल्हय़ामध्ये जमावबंदी आदेश लागू असल्याने आंदोलन करता येणार नाही, असे सांगितले. शिवाय, आंदोलकांना पोलिसांच्या गाडीत बसण्यास भाग पाडले.
आंदोलनामध्ये पोलिसांनी विघ्न आणल्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते चिडले. बजरंग दलाचे शहराध्यक्ष बंडा साळोखे, शिवसेनेचे करवीर तालुकाध्यक्ष राजू यादव, सनातन संस्थेचे शिवानंद स्वामी, सुधाकर सुतार, महेश उरसाल, बाबासाहेब सूर्यवंशी आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी आंदोलकांनी राज्य शासनाच्या निष्क्रियतेबद्दल निषेधाच्या घोषणा दिल्या.
सर्वोच्च न्यायालयाने कबरीच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्याचा आदेश देऊन राज्य शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनधिकृत अतिक्रमणाचे संरक्षण करण्यासाठी आतापर्यंत १ कोटीहून अधिक रुपये खर्च झाले आहेत. राज्य शासन हा न्यायालयाचा अवमान करीत आहे, असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. गांधीनगर पोलिसांनी सर्व आंदोलकांना अलंकार हॉलमध्ये नेले. त्यानंतर आंदोलकांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.