यंदाच्या दुष्काळात तळ गाठलेल्या उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातील धरणांतून पाणी सोडावे या मागणीने उचल खाल्ली असून या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आवाज उठविल्यानंतर आता माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलन हाती घेतले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर-पुणे महामार्गावर, उजनी धरणाजवळ भीमानगर येथे शनिवारी दुपारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारापेक्षा अधिक राष्ट्रवादी कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणात सध्या केवळ सहा टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील शिल्लक पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील पिके जळत आहेत. माढा तालुक्यातच नव्हे तर पंढरपूर, करमाळा आदी सर्व भागात अशीच शोचनीय स्थिती दिसून येते. विशेष म्हणजे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातील या परिस्थितीबद्दल लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे आग्रही पाठपुरावा नसल्याचे दिसून येते. विशेषत: जिल्ह्य़ातील पाणी प्रश्नावर ‘बळी तो कान पिळी’ अशा पध्दतीने लोकप्रतिनिधींची संकुचित भूमिका राहिल्याचे दिसून येते. यात सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हेदेखील हतबल आहेत.
या पाश्र्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातील पाण्याने भरलेल्या १६ धरणांपैकी कोणत्याही धरणातून आवश्यक त्या प्रमाणात पाणी सोडण्याची मागणी केली होती. तसेच केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही आपल्या लोकसभा मतदारसंघातील हा संवेदनशील बनत चाललेल्या या प्रश्नाकडे लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजूबापू पाटील यांनीही शेतकरी मेळावा घेऊन पाण्याच्या प्रश्नावर काहूर माजविले. अशाप्रकारे उजनी धरणातील पाणी प्रश्नावर रान पेटत चालले असताना आता माढा तालुक्यातील अजित पवार समर्थक राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनीही आंदोलन हाती घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी सोलापूर-पुणे महामार्गावर उजनी धरणाजवळ भीमानगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे
सभापती शिवाजी कांबळे, जिल्हा परिषद सदस्य पंडित वाघ, सर्जेराव बागल, उध्दव माळी, माढा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलास सोनिमिंडे, दिलीप भोसले आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. आंदोलनस्थळी आलेल्या तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasta roko for water from pune dams