त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या कारभाराविरोधात छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने आरंभिलेल्या साखळी आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी आंदोलकांनी अचानक रास्ता रोको करत शहरवासीयांना वेठीस धरले. या आंदोलनामुळे मध्यवस्तीतील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाला. काही रस्त्यांवरील वाहतूक वळविल्याने मध्यवस्तीतील बहुतांश रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. साधारणत: दीड तास हा गोंधळ सुरू होता. दरम्यानच्या काळात धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी मागील सोमवारपासून छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले जात आहे.  चार दिवस उलटूनही जिल्हा प्रशासन वा धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून दखल घेतली जात नसल्याने संघटनेने रास्ता रोकोचा पवित्रा स्वीकारल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी वारकऱ्यांच्या उपस्थितीत भजनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी एकच्या सुमारास उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर ठाण मांडले. परिणामी, मेहेर सिग्नलकडून सीबीएसकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी धाव घेऊन आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते मागे हटण्याच्या मनस्थितीत नव्हते. यामुळे मेहेर सिग्नल चौक, महात्मा गांधी रोड, रविवार कारंजापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी महात्मा गांधी रस्त्यावरून येणारी वाहतूक मेहेर सिग्नलवरून अशोकस्तंभमार्गे गंगापूर रस्त्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात सर्वत्र वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाली.सीबीएसकडून अशोकस्तंभकडे जाणारे वाहनधारकही या कोंडीत सापडले. स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे प्रत्येक वाहनधारक मोकळी वाट दिसेल, तिकडून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे ही कोंडी सोडविता सोडविता पोलीस यंत्रणेची दमछाक झाली. दरम्यानच्या काळात धर्मादाय आयुक्त कार्यालयातून अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. निवृत्तीनाथ संजीवन समाधी स्थळाची दुरवस्था आणि संस्थानच्या विश्वस्तांच्या कारभाराची चौकशीची मागणी आंदोलकांनी केली. यावर चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले रास्ता रोको व उपोषणही मागे घेतले. परंतु, तोपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

Story img Loader