वीज कंपनीने श्रावण महिन्यात सुरू केलेले भारनियमन त्वरित बंद करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी महावितरण कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे परभणी-जिंतूर महामार्गावरील वाहतूक तब्बल अडीच तास बंद पडली होती.
वीज कंपनीने रमजान महिन्यात जिल्हाभर भारनियमन बंद केले. श्रावणातही भारनियमन बंद करावे, अशी मागणी असताना वीज कंपनीकडून मात्र सकारात्मक निर्णय होत नसल्यामुळे आमदार संजय जाधव यांनी रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे बुधवारी सकाळी शिवसनिकांनी मोठय़ा संख्येने जिंतूर रस्त्यावरील वीज कार्यालयासमोर जमा होत जिंतूरकडे जाणाऱ्या व परभणीकडे येणाऱ्या गाडय़ा अडवून धरत रस्त्यावरच ठिय्या दिला. त्यामुळे वाहतूक पूर्ण बंद झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. अडीच तास हे आंदोलन चालले. अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर यांना निवेदन देण्यात आले. महिला जिल्हा संघटक सखूबाई लटपटे, उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, संदीप भंडारी, गंगाप्रसाद आणेराव, मारोती बनसोडे, शेख शब्बीर, नवनीत पाचपोर, अनिल डहाळे आदी शिवसनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा