काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या ब्रम्हा व्हॅली शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांने मुंबईत रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद संस्थेचे संकुल असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात उमटले. यावेळी खुद्द पानगव्हाणे यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता सुमारे अडीच तास अडवून ठेवला. प्राचार्याची दमदाटी व मारहाणीमुळे संबंधिताने आत्महत्या केल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्राचार्याचा पुतळा जाळून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. आंदोलनात राष्ट्रवादी आणि मनसे विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. या पाश्र्वभूमीवर संस्थेने प्राचार्य सी. के. पाटील यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंजनेरी शिवारातील ब्रम्हा व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अविनाश खनकर याने मुंबईत आत्महत्या केली. त्याची माहिती सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांना समजल्यानंतर ते अस्वस्थ झाले. अविनाश या निर्णयाप्रत जाण्यास प्राचार्य सी. के. पाटील हेच जबाबदार असल्याचा ठपका मित्र व इतर विद्यार्थ्यांनी ठेवला. अविनाश हा पारनेर तालुक्यातील खडकी गावचा. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याला शैक्षणिक शुल्क भरताना अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे त्याने पत्करलेली नोकरी व्यवस्थापनाच्या रोषाचे कारण ठरली. बाहेर नोकरी पत्करली म्हणून ५२ हजार रूपये शूल्क व दोन हजार रूपये दंड अशी रक्कम भरण्यासाठी प्राचार्याकडून तगादा सुरू होता. त्याला मारहाण, दमदाटीही करण्यात आली. यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय मित्रांनी व्यक्त केला. या बाबतची माहिती अविनाशने चिठ्ठीतही लिहून ठेवल्याचे वसतिगृहातील मित्रांकडून सांगण्यात आले. मागील वर्षांपासून त्याने वसतिगृह देखील सोडले होते. तो या ठिकाणी राहत नसताना त्याच्याकडून शुल्क व दंड आकारणी करण्यात आली. त्यासाठी वेळोवेळी मारहाण व दमदाटी केल्यामुळे अविनाशने आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे हे देखील महाविद्यालयात उपस्थित होते. संबंधित विद्यार्थ्यांने बाहेर आत्महत्या केली असून त्याचा महाविद्यालयाशी काहीही संबंध नाही. आत्महत्येमागे इतर काही भानगड असू शकते, असे पानगव्हाणे यांनी सांगितल्यावर विद्यार्थी अधिकच भडकले. संतप्त विद्यार्थ्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महाविद्यालयाच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको सुरू केले. यावेळी प्राचार्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या शिक्षण संस्थेत यापूर्वीही एका विद्यार्थ्यांचा असाच संशयास्पदपणे मृत्यू झाला आहे. राजकीय प्रभावाचा वापर करून संस्था चालक विद्यार्थ्यांची अडवणूक करतात. तक्रारीची साधी दखलही घेतली जात नाही. उलट तक्रारदारावर दबाव टाकला जातो, असे अनेक आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केले. दरम्यानच्या काळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य सी. के. पाटील यांनी त्रास दिल्यामुळे अविनाश खनकरला आत्महत्या करावी लागली. यामुळे प्राचार्याचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले, अजिंक्य गीते, नवनाथ कोठुळे यांनी केली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आंदोलनात सहभागी होऊन या मागणीला पाठिंबा दर्शविला. या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष पानगव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेऊन प्राचार्याना निलंबित करून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले.
या घटनेचे राजकारण करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. संबंधित विद्यार्थी बाहेरून परीक्षा देत होता. म्हणजे तो महाविद्यालयातील नियमित विद्यार्थी नव्हता. त्याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. तपास यंत्रणा त्यामागील कारणांचा शोध घेतील. या संपूर्ण प्रकाराची पारदर्शकपणे चौकशी करावी, अशी आपली मागणी असल्याचे पानगव्हाणे यांनी नमूद केले.
विद्यार्थी आत्महत्येमुळे ‘ब्रम्हा व्हॅली’ जवळ रास्ता रोको
काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या ब्रम्हा व्हॅली शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांने मुंबईत रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद
First published on: 08-10-2013 at 08:08 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasta roko near bramha valley due to student suicide