गणेशोत्सवात भारनियमन न करण्याचा निर्णय झाला असला तरी संगमनेरला मात्र महावितरणने अचानक भारनियमनाचा झटका दिला. मंगळवारी रात्री ऐन आरतीच्या वेळीच महावितरणने तासाभराचे भारनियमन केले. त्यामुळे संतप्त झालेल्या गणेशभक्तांनी जवळपास दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
भारनियमनाच्या प्रश्नावरून शांतता समितीच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला होता. त्याच वेळी गणेश मंडळांनी महावितरणच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केल्या होत्या, मात्र कोठेही भारनियमन केले जाणार नसल्याची घोषणा झाल्याने सर्वाना हायसे वाटले होते. मात्र महावितरणने झटका देण्याची आपली परंपरा कायम राखली. काल विविध मंडळांची सायंकाळची आरती चालू असताना अचानक वीज गायब झाली. कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता तासाभराचे भारनियमन असल्याचे कळले, त्यामुळे संतापलेले उत्सव समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बसस्थानकासमोर जमा झाले. तेथे त्यांनी महावितरण विरोधात घोषणावाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले.
महावितरणच्या कोणाही अधिकाऱ्याने त्याकडे लक्ष न दिल्याने आंदोलन अधिकच चिघळून पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. नगरसेवक श्रीराम गणपुले, कैलास वाकचौरे व सोमेश्वर दिवटे, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्यासह मंडळांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत हेही आंदोलकापुढे हतबल झाले. अखेर तहसीलदार शरद घोरपडे आंदोलनस्थळी आल्यानंतर त्यांच्यावर विश्वास दर्शवत आंदोलन तूर्तास थांबविण्यात आले. दरम्यान, बुधवारी सायंकाळी पुन्हा सात वाजता वीज गायब झाल्याने कार्यकर्त्यांचा सूर टिपेला पोहोचला आहे. या गणेशोत्सवात भारनियमन हा कळीचा मुद्दा ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Story img Loader