वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी नोकरभरतीच्या मागणीसाठी आमदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसमत रस्त्यावरील विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मराठवाडा कृषी विद्यापीठाने २६ ऑगस्ट २००९ रोजी वर्ग क व ड पदांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार तीन वर्षांनी उशिरा म्हणजे ८ सप्टेंबर २०१२ व ५ जानेवारी २०१३ रोजी लेखी, तोंडी परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया पूर्ण केली. परंतु आजपर्यंत प्रकल्पग्रस्त उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले नाहीत. या उमेदवारांना त्वरित नियुक्ती आदेश द्यावेत, अशी मागणी लावून धरीत या प्रकल्पग्रस्तांनी २३ जुलैपासून विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केले होते. मात्र, गेल्या ७ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी वसमत रस्त्यावर आमदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अशोक सालगोडे, युवा सेनेचे डॉ. राहुल पाटील, मनपातील शिवसेनेचे गटनेते अतुल सरोदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक कदम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, कीर्तीकुमार बुरांडे, सुभाष जावळे, विजय वाकोडे आदींसह शेंद्रा, बलसा, रायपूर, सायाळा, खानापूर, परभणी येथील प्रकल्पग्रस्त आंदोलनात सहभागी होते. युवक राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे विद्यार्थी सेना, शेतकरी संघटना, भीमशक्ती, संभाजी ब्रिगेड, माकपच्या पदाधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. तासभर चाललेल्या रास्ता रोको दरम्यान पोलिसांचा मोठा फौज फाटा तनात होता.

Story img Loader