कोकण रेल्वेमुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तिन्ही जिल्हे मुंबईच्या जवळ आले असे म्हटले जात असून एसटीसाठी लागणारा सात तासांचा प्रवास रेल्वेमुळे केवळ पाच तासांमध्ये शक्य होईल, अशी कोकणवासीयांची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली असून कोकण रेल्वेच्या अनेक गाडय़ा एसटीपेक्षाही धीम्या गतीने धावत आहेत. रत्नागिरी-दादर पॅसेंजर तर नियोजित वेळेपेक्षा चक्क चार ते पाच तास उशिराने धावत असून त्यामुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. सोमवारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडीला दिव्याला येण्यासाठी चक्क ११ तासांहून अधिक काळ लागल्याने या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
कोकण रेल्वेच्या स्थापनेनंतर कोकणासाठी अनेक गाडय़ा सोडण्यात येतील, अशी अपेक्षा असली तरी आतापर्यंत केवळ हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच मर्यादित गाडय़ा कोकणातील प्रवाशांसाठी सोडण्यात आल्या आहेत. बहुतेक गाडय़ा या दक्षिण भारतासाठीच असून त्याचा उपयोग कोकणवासीयांना होत नाही. कोकणात सोडण्यात येणाऱ्या गाडय़ांमध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर आणि दिवा-सावंतवाडी पॅसेंजर या दोन गाडय़ा हजारो प्रवाशांसाठी उपयुक्त ठरल्या असल्या तरी त्यातून प्रवास करणे म्हणजे न केलेल्या गुन्ह्य़ाची शिक्षा भोगणे अशी परिस्थिती कोकण रेल्वे प्रशासनाने आणली आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर या गाडीची तर कोकण रेल्वेच्या मार्गावर नेहमीच रखडपट्टी होते आणि प्रवाशांना खोळंबून राहावे लागते.

रत्नागिरी पॅसेंजरबद्दल दुजाभाव..
रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडीबद्दल कोकण आणि मध्य रेल्वे नेहमीच दुजाभाव करीत असून नियोजित वेळेपेक्षा ही गाडी नेहमीच उशिरा धावत असते. अनेक गाडय़ांना मार्ग करून देताना या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोणतीही काळजी घेतली जात नसून पॅसेंजर प्रवाशांच्या वाटय़ाला केवळ मनस्ताप येतो. राजकीय मंडळीही याकडे लक्ष देत नसल्याने ही समस्या कायम आहे, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे संतोष पवार यांनी व्यक्त केली.
विषारी किटक, अंधाराचा त्रास..
परतीच्या प्रवासात दुपारी ३.३५ वाजता दादर स्थानकातून सुटणे अपेक्षित असणाऱ्या या पॅसेंजर गाडीचा प्रवास ती नेहमीच उशिरा असल्याने दिव्यातूनच संध्याकाळी सहाच्या सुमारास सुरू होतो. इतर गाडय़ांना वाट करून देत रडतरखडत तिचा प्रवास सुरू असतो. त्याच वेळी अनेक विषारी कीटक गाडीमध्ये शिरून त्याच्या दंशामुळे अनेक प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. लहान मुलांना त्याचा त्रास मोठा असून त्यामुळे मुलांच्या रडण्याचा कोलाहल गाडीमध्ये पसरलेला असतो, अशी माहिती या रेल्वेतून प्रवास केलेल्या प्रवासी जयश्री यादव यांनी दिली.

‘कोरे’कडून फक्त दीड तास उशीर
रत्नागिरी-दादर पॅसेंजरला सोमवारी झालेल्या उशिरा संदर्भात कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांना विचारले असता रत्नागिरीवरून सुटलेली गाडी मध्य रेल्वेच्या हद्दीत जाईपर्यंत नियोजित वेळेपेक्षा केवळ दीड तास उशिरा होती. यापुढील जबाबदारी मध्य रेल्वेची असल्याचे त्यांनी सांगितले. एका एक्स्प्रेसचे इंजिन बिघडल्याने रत्नागिरी पॅसेंजरचे इंजिन लावून ही समस्या सोडविण्यात आली. त्यामुळे गाडीला उशीर झाला. रोजच्या उशिराबद्दल मात्र नेमकी कारणे लगेच सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader