लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा जोतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोखले, परांजपे, आगरकर, काकासाहेब गाडगीळ, शंकरराव देव, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, म.म.द.वा. पोतदार, हरिभाऊ पारसकर, धनंजयराव गाडगीळ या दिग्गजांचं पुणं, पु. ल. देशपांडे, पु. ग. सहस्रबुद्धे, श्री. के. क्षीरसागर, ग. दि. मा., ग. वा. बेहरे, ना. सी. फडके, भीमसेन जोशी, यशवंत दत्त, निळू फुले, दादा कोंडके, सुधीर फडके, माडगूळकर बंधू, अशा साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात उभ्या देशात नाव करणाऱ्या श्रेष्ठांचं पुणं! आज ‘रेव्ह पार्टीचं शहर’, ‘चिल्लर पाटर्य़ाचं शहर’ म्हणून ओळखलं जावं ही शहराची प्रगती म्हणावी की अधोगती? पुण्याचा शनिवारवाडा, पर्वती, रास्तेवाडा, लालमहाल या ऐतिहासिक वास्तूच्या खुणा पुसत चालल्यात. नव्या टोलेजंग अपार्टमेंट्सनं या झाकून गेल्या आहेत. इतिहास आणि भूगोलाच्या स्थित्यंतराबरोबर शैक्षणिक-सांस्कृतिक क्षेत्रातली अधोगती, पुण्यात ज्यांनी काही काळापूर्वी शिक्षण घेतलं. त्या पुण्याशी ज्यांचा संबंध होता त्यांना क्लेशकारक आहे. ‘पुणं तिथं काय उणं’ असं अभिमानानं म्हणणारे पुणेकर ‘पुणं तिथं सारं उणं’ असं मनोमन म्हणत असतील. नव्हे उघडही म्हणत असतील.
देशातल्या अन्य शहरांत शिक्षणासाठी आपल्या मुलामुलींना घालण्यापेक्षा पुण्यात घालणारे निर्धास्त असणारे पालक आज पुण्यात पाल्यांना शिक्षणासाठी ठेवतील का? ठेवत असतील तर ती मुलं कसल्या प्रकारचं शिक्षण घेतात? हे उघड झालं आहे. शिकणारे नाहीत, नसतील असं नाही, पण ‘वीकएंड पार्टी’, ‘रेव्ह पार्टी’, ‘चिल्लर पार्टी’चं वारं, वादळ होऊन संपूर्ण शिक्षणव्यवस्थेचा उद्ध्वस्त करेल काय, अशी धास्ती सर्वसामान्यांना वाटू लागली आहे. प्रसिद्धिमाध्यमाचे आकडे भयंकर आहेत. वास्तव आणखी भयानक असेल. पूर्वीच्या रेव्ह पार्टीत आठशे, कालच्या हायप्रोफाईल दारू ‘माया’ पार्टीत तीनशे तरुण-तरुणी मद्यधुंद आणि अर्धनग्नावस्थेत रात्री एकपर्यंत ही मुलं कसला अभ्यास करत असतील? याचा विचार आई-वडिलांनी केला पाहिजे. ‘अंधार व्हायच्या आत मुलांनो घरी या’ म्हणून सांगणारे आईबापच घरात नसतील, तर अशीच वाताहत होणार नाही का घराची आणि समाजाची ! आई-बापच घराबाहेर राहात असतील रात्ररात्र तर मुलं कशी येतील घरी. वसतिगृही!
‘शुभं करोति कल्याणं’ शिकवणारी आई राहिली नाही. ती ममी, मॉम होऊन स्वत: पाटर्य़ात मिरवीत असेल तर त्याचा परिणाम असाच होणार! दुधातुपाची जागा मद्यानं घेतली. भाकरीची जागा ब्रेड-बिस्किटांनी घेतली. गुऱ्हाळ आणि गुळाची जागा साखर कारखाना, मद्यार्क बनवणाऱ्या फॅक्टरींनी घेतली. स्वत: आईबापच घेत असतील तर त्यांना मुलांना घेऊ नकोस म्हणून सांगण्याचा नैतिक अधिकार कुठे उरतो? पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधितांचे पब्स राजनेत्यांच्या आप्त बांधवांच्या हॉटेल्समधून या राजरोस गोष्टी होतात. ‘खल निग्रहणाय सद् रक्षणाय’ ब्रीद मिरवणारे काय करतात? राज्याचं गृह खातं काय करतं? असं रयतेला वाटणं स्वाभाविक नाही का? आज रयत बोलत नाही. पण ती अधिक काळ यापुढे अशीच सहन करत राहील असं समजणं चुकीचं होईल. जाणत्या राजाला हे सारं कळत नसेल का?