बडनेराचे आमदार रवी राणा आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष पेटतच चालला असून रवी राणा यांनी आज येथील राजापेठ पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली. संजय खोडके यांच्या आदेशावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी साईबाबांचे छायाचित्र असलेल्या पोस्टरवर काळे फासून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे, तसेच रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या पोस्टरवरही काळे फासल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. दरम्यान, या मुद्यावर आपण अमरावतीत आल्यानंतर प्रतिक्रिया देऊ, असे संजय खोडके यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने येथील दसरा मैदानावर १२ जानेवारीपासून स्वाभिमान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवादरम्यान १२ आणि १३ जानेवारीला ‘शिर्डी के साईबाबा’ या महानाटय़ाचे प्रयोग झाले. दसरा मैदानाच्या प्रवेशद्वारावर साईबाबांचे छायाचित्र आणि त्याखाली आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी नवनीत यांचे छायाचित्र असलेले पोस्टर लावण्यात आले होते. या छायाचित्रांवर सोमवारी सकाळी काळे फासण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला. रवी राणा यांनी यासंदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात लगेच लेखी तक्रार नोंदवली. त्यात संजय खोडके यांच्या आदेशावरून त्यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या ९ जानेवारीला यशोदानगरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूल आणि रस्ते सुधारणा कामाच्या लोकार्पण प्रसंगी माजी महापौर किशोर शेळके, स्थायी समिती सभापती चेतन पवार, गटनेते अविनाश मार्डीकर, नंदकिशोर वऱ्हाडे आदी कार्यकर्त्यांनी आपल्याला काळे झेंडे दाखवून धमक्या दिल्या होत्या. असाच प्रकार १० जानेवारीला अंजनगाव बारी येथील कार्यकर्त्यांनी केला. अंजनगाव बारीत पाय ठेवला, तर हातपाय तोडून टाकू, अशा धमक्या कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या, असा गंभीर आरोपही रवी राणा यांनी तक्रारीत केला आहे.
या घटनेविषयी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवूनही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. आरोपींना संजय खोडके यांचे संरक्षण असल्याचेही राणा यांनी तक्रारीत म्हटले आहे. गेल्या वर्षीही युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर रेल्वे स्टेशन चौकातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला होता. सोमवारी साईबाबा यांच्या छायाचित्राला काळे फासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आपल्या छायाचित्राला काळे फासून शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. संजय खोडके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करून तत्काळ कारवाई करावी, भविष्यात आपल्या जीविताला मोठा धोका आहे, असेही रवी राणा यांनी म्हटले आहे. आपल्या किंवा कार्यकर्त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाले, तर त्याला संपूर्ण जबाबदार संजय खोडके राहतील, असेही तक्रारीत नमूद आहे.
आ. रवी राणा व राष्ट्रवादीतील संघर्ष तीव्र
बडनेराचे आमदार रवी राणा आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष पेटतच चालला असून रवी राणा यांनी आज येथील राजापेठ पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली.
First published on: 15-01-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi rana and ncpqurrel became deep