आदिमानवापासून आजच्या आधुनिक युगापर्यंत वाटचाल करताना माणसानं केवळ भौतिक प्रगतीच केलेली नाही, तर स्वत:चं जीवन समृद्ध, सुसंस्कृत होण्यासाठी त्यानं काही सामाजिक नीतिनियम बनविले. बाह्य़ जगात वावरताना व्यक्तीचं वागणं, बोलणं, पेहेराव, भाषा आणि व्यवहार यामुळे इतरांना डोळे व कान बंद करून घ्यावे लागू नयेत, वा त्यांच्या हक्कांवर गदा येऊ नये यासाठी काही सामाजिक संकेतही त्याने रूढ केले; ज्यामुळे व्यक्तीबरोबरच कुटुंब आणि समाजव्यवस्थाही मजबूत होईल! या व्यवस्थेत कुणावर अन्याय-अत्याचार होणार नाहीत. कुणाचं शोषण होणार नाही. बाहेरच्या जगात वावरताना कुणाला लज्जित व्हावं लागणार नाही. हजारो वर्षांच्या मानवी अनुभवांच्या संचितातूनच हे सामाजिक नीतिनियम उत्क्रांत होत गेलेले आहेत. आज मात्र काळाचं हे चक्र उलटं फिरवण्याची प्रक्रिया वेगानं सुरू झाल्याचं प्रकर्षांनं जाणवतं आहे. आपण भौतिकदृष्टय़ा अत्याधुनिक, परंतु आचरणदृष्टय़ा आदिमानव काळाकडे चाललो आहोत असं वाटावं अशी सध्याची स्थिती आहे. आदिमानव हा पशूत्वाकडून सुसंस्कृततेकडे जाणारा मानवाचा पहिला टप्पा असल्यानं त्याकाळी त्याला आपल्या वर्तन व कृतीबद्दल कसला विधीनिषेध नसणं, किंबहुना त्याची साधी जाणीवही त्याला नसणं स्वाभाविक होतं. परंतु आज आपण कळतेपणानं ‘आदिमानव’ होऊ पाहतो आहोत ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे. माणूस हा मूलत: स्खलनशील ‘प्राणी’ आहे. परंतु त्याला आपल्या भावना-विकारांवर बुद्धीच्या माध्यमातून काबू ठेवता येते. मात्र, ‘तसं करण्याची गरजच काय? माणूस जसा आहे तसा व्यक्त झाला.. वागला, तर बिघडलं कुठं?,’ असा युक्तिवाद करणाऱ्या अतिरेकी व्यक्तिवाद्यांची संख्या आज समाजात वाढते आहे. आणि याचा प्रत्यय प्रत्येक क्षेत्रात येतो आहे. ‘सार्वजनिक सभ्यता’ नावाची गोष्ट आता व्यक्तिसापेक्ष होऊ लागली आहे. शिवाजी पार्क वा तत्सम ठिकाणच्या जाहीर सभांमधून वर्षांनुवर्षे असभ्य, शिवराळ भाषेत होणाऱ्या राजकारण्यांच्या भाषणांवर श्रोते आनंदानं माना डोलावतात. टाळ्या पिटतात. पोलीस त्या भाषणांचं (नुसतंच!) रेकॉर्डिग करतात. शासनकर्तेही या भाषणांवर ‘‘अभ्यास’ करून कारवाई करू,’ म्हणून तोंडदेखलं आश्वासन देऊन प्रश्नकर्त्यांची बोळवण करतात. परंतु पुढे काहीच करीत नाहीत. काही प्रसार माध्यमे आपली स्व-आचारसंहिता पाळून अशा भाषणांमधली बहुतांश असभ्यता वगळून त्यांचं वार्ताकन करतात. (हल्ली इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या थेट प्रक्षेपणामुळे हाही सार्वजनिक संकेत शिल्लक राहिलेला नाही.) लोक मिटक्या मारत या सभांचे वृत्तान्त वाचतात/ पाहतात. चार दिवस त्यावर उलटसुलट चर्चेचं चर्विचचर्वण चालवलं जातं. नंतर सगळं आपसूक विसरलं जातं.
दुसरीकडे नटय़ांचे उघडेनागडे फोटो छापून/ दाखवून त्यांची लफडी चविष्टपणे चघळण्याची स्पर्धाही माध्यमांमध्ये लागलेली दिसते. आपल्याकडच्या ९९.९९ टक्के चित्रपटांमध्ये कथेची किंचितही गरज नसताना नायिकेचं होणारं मुक्त अंगप्रदर्शन आता कुणालाच खटकेनासं झालं आहे. घरातल्या इडियट बॉक्समध्ये मालिका, जाहिरातींमधून गरज असो-नसो, दाखविली जाणारी निकटदृश्ये सहकुटुंब कुठल्याही अपराधगंडाविना पाहिली जातात. अशा तऱ्हेनं आपण एकंदर सार्वजनिक असभ्यतेचा स्वीकार कळत-नकळतपणे आता केलेलाच आहे. त्याचं कुणालाच काही वाटेनासं झालेलं आहे.
या स्वीकाराचीच पुढची पायरी म्हणून अशोक पाटोळे-अजित केळकर सादर करत असलेल्या ‘एक चावट संध्याकाळ’ या अश्लील विनोदी किश्श्यांच्या कार्यक्रमाचा उल्लेख करावा लागेल! खासगी आयुष्य आणि सार्वजनिक ठिकाणचं वर्तन यांच्यातला उरलासुरला भेदही संपवण्याचं या द्वयीनं मनावर घेतलेलं आहे. इथे फक्त प्रश्न एवढाच उपस्थित होतो की, आपण आपल्या आयुष्यात जे काही अत्यंत खाजगीत अनुभवतो, किंवा आपल्या चंचल मनोभूमीवर काही वेळा मनुष्य जे स्वैर, उच्छृंखल खेळ खेळत असतो, तेही आता ‘वास्तवाला सामोरं जाण्याचा बेधडकपणा’ या सदरात, किंवा भावनांचा निचरा म्हणून प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करण्यालाही आपण मान्यता देणार आहोत काय? या गोष्टीलाही या दोघांची मान्यता असेल का? हे जर मान्य असेल तर मग प्रश्नच मिटला. ‘एक चावट संध्याकाळ’ ते बेशक सादर करू शकतात.
एखादी गोष्ट करण्यामागचा ती करणाऱ्याचा हेतू सुस्पष्ट असायला हवा. ‘सिनेमात सगळं काही उघडंनागडं दाखवलेलं चालतं, तर मग आम्ही अश्लील विनोद सार्वजनिकरीत्या पेश केले तर काय मोठा गुन्हा केला?,’ असं समर्थन ते करतात. गफलत तिथंच आहे. हल्ली सरसकट सगळ्याच सिनेमांतून जे अनावश्यक अंगप्रदर्शन दाखवलं जातं ते सर्वथा गैर आणि गैरच आहे! हा- आता ‘बॅण्डिट क्वीन’सारख्या सिनेमात फुलनदेवी कशी घडली वा बिघडली, हे दाखविण्यासाठी तिच्यावर झालेला सामूहिक बलात्कार त्यातल्या भीषणतेसह वास्तवदर्शी पद्धतीनं दाखवणं, ही त्या चित्रपटाची निकड होती. परंतु ‘बॅण्डिट क्वीन’ पाहताना प्रेक्षकांच्या कामभावना चाळवत नव्हत्या, तर बलात्काराचे ते दृश्य पाहताना त्यातली भीषणता अंगावर शहारे आणत होती. हे झालं सिनेमाचं उदाहरण! नाटकाचं उदाहरण देतो. ज्येष्ठ मणिपुरी नाटय़-दिग्दर्शक कन्हैय्यालाल यांनी त्यांच्या ‘द्रौपदी’ या नाटकात स्त्री-शोषणाचा विषय हाताळताना एका क्षणी त्यातली स्त्री संपूर्ण नग्न रूपात रंगमंचावर दाखवली होती. अर्थात या स्त्रीची परिस्थितीनं केलेली परवड अनुभणाऱ्या प्रेक्षकांना तोवर अशा एका मन:स्थितीपर्यंत नाटकानं आणून ठेवलेलं होतं, की तिचं ते नग्न रूप पाहताना त्यांना जबर मानसिक धक्का बसला होता. ते अक्षरश: गोठून गेले होते. तिची नग्नता ‘एन्जॉय’ करण्याचा विचारही कुणाच्या मनात येणं शक्य नव्हतं.
याच्या उलट घडलेलं एक उदाहरणही इथं देतो. रंगमंचीय आविष्करणात वास्तवाच्या अतिरेकी हव्यासापोटी बीभत्सपणा कसा येतो, हे त्यातून समजेल. लक्ष्मण माने यांच्या ‘उचल्या’ या आत्मकथनावर ‘एनएसडी’ने सादर केलेल्या हिंदी नाटकात गावात सकाळी उघडय़ावर शौचाला जाण्याचा प्रसंग दिग्दर्शिका अमल अलाना यांनी वास्तवदर्शी पद्धतीनं मंचित केला होता. तो पाहताना प्रेक्षकांना अक्षरश: शिसारी आली होती. वास्तवाचा असला अट्टहास नाटक सादर करण्याच्या मूळ हेतूलाच कसा मारक ठरतो, याचं हे वानगीदाखल उदाहरण!
सिनेमा हे ‘दाखवण्याचं’, तर रंगमंच हे ‘सूचकतेचं’ माध्यम आहे असं म्हणतात. रंगमंचावर वास्तव सादर करताना तरल कलात्मकतेचा आधार घेणं अपेक्षित असतं. नव्हे, नाटककर्त्यांचं बुद्धीसामथ्र्य आणि कौशल्य त्यातूनच तर प्रकट होत असतं. हे भान रंगभूमीवर वावरणाऱ्या प्रत्येकाला असायलाच हवं.
आता ‘एक चावट संध्याकाळ’कडे वळूयात. या कार्यक्रमात प्रा. बारलिंगे आणि सेक्सॉलॉजिस्ट डॉ. तलवडे हे दोघं सार्वजनिक असभ्यतेवर पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या एका स्त्रीला- मिसेस झाटय़े यांना मार्गदर्शन करण्याकरता अश्लीलता, अश्लील जोक्स यावर ‘सामूहिक चिंतन’ करतात. त्याचंच फलित म्हणजे ही ‘चावट संध्याकाळ’! या बाईंना सगळं ‘रेडिमेड मटेरियल’ पुरवण्याचं कंत्राट प्रा. बारलिंगेंनी घेतलंय. (सगळं आयतं मिळाल्यावर या बाई स्वत: काय ‘संशोधन’ करणार, कुणास ठाऊक!) त्यासाठी ते आपले सेक्सपर्ट मित्र डॉ. तलवडेंची मदत घेतात. दोघं  छानपैकी ‘बैठक’ जमवून अश्लील विनोदांचा आपापला स्टॉक बाहेर काढतात आणि आपलं व प्रेक्षकांचंही त्याबद्दलचं ‘ज्ञान’ अपडेट करतात. द्वय़र्थी संवाद, लैंगिक विनोद, शिव्यांमध्ये असलेलं भावभावनांचं ठाशीव प्रकटन वगैरेची कार्यक्रमभर उजळणी होते. त्यात आचार्य अत्रे आणि दादा कोंडके यांचे किंवा त्यांच्या नावावर खपवल्या गेलेल्या किश्श्यांचाही अंतर्भाव आहे. ‘शिवी ही अहिंसेला पोषक आहे..’ हा डॉ. तलवडे यांचा अनुभवसिद्ध निष्कर्ष हा हिंसक सामाजिक उद्रेकास पायबंद घालण्याच्या शिव्यांच्या ‘शक्ती’मुळे सकृत्दर्शनी काही अंशी पटण्यासारखा असला, तरीही त्यातून अधिक हिंसा उफाळणारच नाही याची तरी कुणी शाश्वती देईल का? असो.
या कार्यक्रमाचे ‘लेखक’ म्हणून अशोक पाटोळे यांचं नाव का दिलं जातं, कळत नाही. त्याऐवजी ‘संकलना’चं श्रेय त्यांना द्यायला हवं. हा कार्यक्रम सादर करण्यामागचा अशोक पाटोळे आणि अजित केळकर यांचा नेमका हेतू काय? लोकांचं रंजन? त्यांच्या दडपल्या गेलेल्या विकार-विकृतींना वाट करून देणं? की आपला तथाकथित सभ्यतेचा मुखवटा उतरवून आपण जसे आहोत तसे सार्वजनिकरीत्या पेश व्हायला प्रेक्षकांना (खरं तर श्रोत्यांना!) भाग पाडणं? की हा कार्यक्रम सादर करून सरळसरळ धंदा करणं? ..या प्रश्नांची उत्तरं ज्याची त्यानं मिळवावीत.
या कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांचं तटस्थपणे निरीक्षण केलं असता (अर्थात मी पाहिलेल्या प्रयोगाबद्दलच मी हे विधान करतोय!) एक स्पष्टपणे जाणवलं की, हे नाटकाला येणारे नेहमीचे प्रेक्षक नाहीत. त्यातही तरुणवर्ग आणि स्त्रिया तुरळकच होत्या. आणि बहुसंख्य प्रेक्षक हे पंचेचाळीशीच्या पुढचेच होते. आणि ते हा कार्यक्रम ‘एन्जॉय’ करत होते. याचाच अर्थ- समाजातील एका विशिष्ट वर्गाची असा कार्यक्रम ही ‘निकड’ असावी. सार्वजनिक सभ्यता, संकेत यांच्याशी आता लोकांना काही देणंघेणं उरलेलं नसावं. असं जर असेल तर मग ‘एक चावट संध्याकाळ’बद्दल बोंब मारण्यात काय हाशील?

dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”
Air quality index in Delhi area
शिक्षा, काळ्या हवेची!
importance of stability in life
सांधा बदलताना : मैत्र जीवांचे…
treatment personality disorders
स्वभाव-विभाव : विकारांतून मुक्ती
Laxman Savadi
Karnataka : “मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा”, कर्नाटकच्या आमदाराची विधानसभेत मागणी; म्हणाले, “आमचे पूर्वज…”
Story img Loader