सध्याच्या असंवेदनशील काळात समाजाची संवेदना जागृत ठेवण्याचे काम साहित्य आणि संस्कृतीचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक-शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘संवेदना’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते झाले. परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी, कोशाध्यक्ष सुनील महाजन, दिवाळी अंकाच्या संपादक डॉ. नीलिमा गुंडी आणि मनोहर सोवनणे यावेळी उपस्थित होते.
‘आठवणींतले यशवंतराव चव्हाण’ या विषयावर बोलताना डॉ. न. म. जोशी यांनी गोष्टीरूपाने यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, राजकारणाला सांस्कृतिक चेहरा देणारे एकमेव नेते म्हणजे यशवंतराव. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सहवासात ते घडत गेले. स्वातंत्र्यचळवळीच्या काळात लोकजागृती करणाऱ्या यशवंतरावांना तुरुंगवास घडला. तेथे कार्ल मार्क्‍स, शेक्सपिअर यांच्या साहित्य वाचनातून त्यांचे व्यक्तित्व फुलत गेले. यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवली. देशाचे नेतृत्व करण्याची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम केले. समतोल विचारांचे राजकारणी अशी प्रतिमा असलेल्या यशवंतरावांनी विरोधकांच्या मतांचाही आदर केला.    

Story img Loader