कोल्हापूर येथे चौदा महिन्याच्या बालिकेवर परप्रांतीय तरुणाने केलेल्या बलात्काराच्या निषेधार्थ इचलकरंजी येथे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मराठा विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कल्पना चित्रमंदिरवर जोरदार दगडफेक करून भोजपुरी चित्रपटाचे पोस्टर फाडले. या चित्रपटाचे दोन खेळही बंद पाडले. मलाबादे चौकात कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली.
सोमवारी कोल्हापूर येथे चौदा महिन्याच्या बालिकेवर राजेशसिंह बबलुसिंग या तरुणाने बलात्कार केला. या घटनेचे संतापजनक पडसाद इचलकरंजीत उमटले. मुख्य मार्गावर असलेल्या कल्पना चित्रमंदिरात भोजपुरी भाषेतील चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मराठी विद्यार्थी सेनेने लक्ष्य केले. त्यांनी चित्रपटगृहावर दगडफेक करीत पोस्टर फाडून टाकले. परप्रांतीयांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बंद पाडला. चित्रपट पाहत असलेल्या सर्व प्रेक्षकांना पिटाळून लावले.     
यानंतर कार्यकर्ते मलाबादे चौकात आले. तेथे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांदेकर, राकेश कागले, शिरीष कांदेकर, मंगल देसाई आदींनी परप्रांतियांविरोधात निदर्शने केली. दरम्यान चित्रपटगृहात येऊन गोंधळ घातल्याचे वृत्त समजल्यावर गृहाचे मालक सुनिल सांगले तेथे आले. सांगले यांनी हिंदी भाषेतील चित्रपट असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण बेभान कार्यकर्ते ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कॉ.के.एल.मलाबादे या मध्यवर्ती चौकात अचानक झालेल्या आंदोलनामुळे तेथे शिवाजीनगर व गावभाग पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
बालिकेवर बलात्काराचे कोल्हापुरात संतप्त पडसाद
प्रतिनिधी, कोल्हापूर    
परप्रांतीय तरुणाकडून दीड वर्षांच्या बालिकेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचे मंगळवारी कोल्हापूर शहरात संतप्त पडसाद उमटले. फुलेवाडी नाक्यावर स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त जमावाकडून वाहनांवर दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. या आंदोलनाला शिवसेना व मनसेकडून पाठबळ मिळाले. अशातच बालिका दगाविल्याचे वृत्त पसरल्याने शहरात तणाव निर्माण होऊन सायंकाळपर्यंत शहरात बंदसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत अक्षय मेट्ल्स या कंपनीत काम करणाऱ्या २५ ते ३० परप्रांतीय कामगारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली.     
सोमवारी कसबेकर हॉल परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी चौदा महिन्यांच्या बालिकावर राजेशसिंह बबलुसिंह या झारखंडमधील सेंट्रिंग कामगाराने बलात्कार केला होता. ही घटना समजल्यावर काल सायंकाळी शहरात शिवसेनेकडून तर औद्योगिक वसाहतीत मनसेकडून परप्रांतीयांना लक्ष्य केले होते. आज मंगळवारी या घटनेची पुनरावृत्ती घडली. बालिकेचे कुटुंबीय राहत असलेल्या फुलेवाडी परिसरात स्थानिक नागरिक, नातेवाईक यांनी दुपारी अचानक आंदोलन सुरू केले. रस्त्यावर मोठय़ा संख्येने उतरलेल्या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांची कुमक मोठय़ा प्रमाणावर पोहोचली. पोलिसांनी आंदोलन थांबविण्याचे आवाहन नागरिकांना केले. मात्र त्याला प्रतिसाद मिळण्याऐवजी नागरिकांकडून दगडफेक सुरू झाली. दगडफेकीत काही वाहनांची नासधूस झाली. आक्रमक झालेल्या आंदोलकांना काबूत आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पुरुषांबरोबर महिलांनाही लाठीचा प्रसाद मिळाला. अरेरावीची भाषा सुरू झाल्याने आंदोलक अधिकच संतप्त झाले. त्यामुळे या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुमारे अध्र्या तासाहून अधिक काळ हा गोंधळ सुरू होता. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलीस थेट आजूबाजूला असलेल्या शेतामध्ये घुसले होते. अशातच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली होती. संतप्त झालेल्या महिलांनी पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार यांची भेट घेऊन आरोपी राजेशसिंह याच्याविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. दूध पिणाऱ्या बाळालाही या नराधमाने सोडले नाही. यामुळे आमच्या मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. राजेशसिंह वर कडक कारवाई झाल्याशिवाय या प्रकारांना आळा बसणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या. नागरिकांच्या बाजूने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह शिवसैनिक तसेच मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील व कार्यकर्ते हे उतरले होते.
दरम्यान बलात्कारपीडित बालिका दगाविल्याची अफवा शहरात पसरताच तेथे शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. बालिका सुरक्षित असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगत पोलीस प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले. तथापि अफवा इतक्या जलदगतीने पसरली, की काही काळातच शहरातील राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड या प्रमुख ठिकांणांसह सर्वत्र बंदसदृश परिस्थिती निर्माण झाली. शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते.    
गोकुळ शिरगाव येथे एमआयडीसीतील अक्षय मेटल्स या कंपनीतील परप्रांतीय कर्मचाऱ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. सुमारे २५ कर्मचारी तेथे काम करीत होते. त्यांना गाठून १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी चोप दिल्याने औद्योगिक वसाहतीतील वातावरण तणावपूर्वक बनले होते. तसेच ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसरात एका बांधकामावर काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचे साहित्य असलेल्या गाडीची मनसेच्या कार्यकर्त्यांनी नासधूस केली. त्याचे साहित्य रस्त्यावर आणून पेटवून दिले. ‘परप्रांतीय हटाओ, कोल्हापूर बचाओ’ अशा घोषणा मनसेच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या.
बालिकेवरील बलात्काराचे राधानगरीत पडसाद
प्रतिनिधी, कोल्हापूर    
कोल्हापुरातील बालिकेवरील बलात्काराचे पडसाद मंगळवारी राधानगरी येथे उमटले. तेथे एका गारमेंटमध्ये काम करणाऱ्या ३५ बिहारी कर्मचाऱ्यांना गाठून मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. ओळखपत्राशिवाय काम कसे करता असे म्हणत त्यांना धारेवर धरले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली.     
राधानगरी येथे मुख्य मार्गावर असलेल्या बँक ऑफ इंडियाजवळ गौरी गारमेंट हे दुकान आहे. तेथे तयार कपडे बनविण्यासाठी बिहारी कामगारांना आणून ठेवले आहे. गेल्या महिन्यात येथील एका कर्मचाऱ्याने गावातील एका तरुणीला पळवून नेले होते. त्यामुळे ग्रामस्थांचा या कर्मचाऱ्यांवर राग होता. अशातच कोल्हापूर येथे परप्रांतीय तरुणाकडून बालिकेवर बलात्काराचा प्रकार घडला. यामुळे राधानगरीतील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.    
मनसेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष उध्दव इरूडकर यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते गौरी गारमेंटमध्ये गेले. त्यांनी तेथील बिहारी कामगारांना ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. त्यापैकी दोघा-तिघांकडेच ओळखपत्र होते. तहसीलदार व पोलीस यांच्याकडे ओळखपत्राची नोंद न करता काम कसे करता असे विचारणा करून कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरले. गौरी गारमेंटचे चालक पाटील यांनी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र ओळखपत्राशिवाय कामगारांना काम करू देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. तेथे राधानगरीचे पोलीस आल्यानंतर त्यांनी वाद चिघळू न देता परिस्थिती आटोक्यात आणली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा