वाचाल तर वाचाल!
सध्या मुलांमधील वाचनाची आवड कमी होत चालली असल्याची ओरड ऐकू येत असली तरी आजच्या पिढीनेही ‘वाचाल तर वाचाल’ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रंथालयातील बालविभागाला उन्हाळी सुट्टीत चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुस्तके वाचण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक ग्रंथसंग्रहालयाचे सभासदत्व घेतले जात आहे. काही ग्रंथालयानी सभासद नसलेल्या मुलांसाठीही ग्रंथालयात बसून पुस्तके वाचण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यालाही चांगला प्रतिसाद आहे. ग्रंथप्रदर्शने व पुस्तकांच्या दुकानातूनही लहान मुलांच्या पुस्तकांची चांगली खरेदी होत असल्याचे दिसून येत आहे. दादर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल अश्विनी फाटक म्हणाल्या की, वाचनाची आवड आजच्या पिढीतही कायम आहे. ‘दासावा’चे सध्या सुमारे सव्वाशे ते दीडशे बाल सभासद आहेत. उन्हाळी सुट्टीमध्ये यात साधारण २० ते २५ नव्या सभासदांची भर पडते. या खेरीज १४ वर्षे वयोगटापर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दासावा’तर्फे गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी सुट्टीत एक आगळा उपक्रम राबवला जातो. मुलांनी वाचनालयात येऊन येथे बसून त्यांना हवी असलेली पुस्तके आम्ही वाचण्यासाठी मुलांना उपलब्ध करून देतो. या उपक्रमातही सध्या दररोज पाच ते दहा मुले सहभागी होत आहेत.
विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या काजल पाटील यांनी सांगितले की, उन्हाळी सुट्टीत ग्रंथसंग्रहालयाच्या बालविभागाच्या सभासद संख्येत दरवर्षी काही प्रमाणात वाढ होते. आमच्या ग्रंथसंग्रहालयात स्वतंत्र बालविभाग असून तीन महिन्यांसाठी ९० रुपये शुल्क आम्ही आकारतो. अट एकच की मुलांनी ग्रंथालयात येऊन व तेथेच बसून पुस्तके वाचायची. १५ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत हा उपक्रम चालविण्यात येतो. मुलांच्या वाचनाविषयीचे निरिक्षण नोंदविताना त्या म्हणाल्या की, सध्या ‘डायरी ऑफ व्हिम्पी’, ‘हॅरी पॉटर’, फास्टर फेणे (इंग्रजी अनुवाद) या पुस्तकांबरोबरच ‘इसापनीती’, ‘पंचतंत्र’ आदी जुनी पुस्तकेही अद्याप लोकप्रिय आहेत.
गेली अनेक वर्षे गावोगावी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणाऱ्या ‘अक्षरधारा’ या संस्थेचे लक्ष्मण राठीवडेकर यांनी सांगितले की, आत्ताच्या पिढीतील मुलांचे वाचन बदलले आहे. परिकथा, जादुच्या गोष्टी यापेक्षा आता चरित्र, विज्ञान, पर्यावरण आदी विषयांवरील विविध पुस्तके कुमार वयोगटातील मुलांकडून जास्त प्रमाणात वाचली जात आहेत. तर त्याहून लहान असलेल्या मुलाांसाठी ‘चित्रमय गोष्टी’च्या पुस्तकांचे खास आकर्षण आहे.
वाचनाची आवड आजही कायम; बालविभागाला चांगला प्रतिसाद
वाचाल तर वाचाल! सध्या मुलांमधील वाचनाची आवड कमी होत चालली असल्याची ओरड ऐकू येत असली तरी आजच्या पिढीनेही ‘वाचाल तर वाचाल’ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रंथालयातील बालविभागाला उन्हाळी सुट्टीत
First published on: 18-04-2013 at 02:20 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reading hobby not end great responce to childrens department