अनुभव विश्व विस्तारण्यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करण्याची आवश्यकता असून त्यासाठी त्यांनी विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी मंगळवारी मुंबईत केले.
मुंबई मराठी साहित्य संघ आणि सोमय्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमय्या महाविद्यालयाच्या सभागृहात  आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलनप्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते.संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा उषा तांबे, उपाध्यक्षा उज्ज्वला मेहेंदळे, महाविद्यालयाच्या विश्वस्त नीलाबेन कोटक आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी इनामदार यांनी ‘मराठी अभिमान गीत’ कसे तयार झाले त्याची पाश्र्वभूमी सांगितली. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवी-गीतकार गुरू ठाकूर यांची विद्यार्थ्यांनी प्रकट मुलाखत घेतली. कविता आणि गाणे कसे सुचते या विषयावर ठाकूर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली ‘साहित्य संमेलन आणि तरुण पिढी’ हा परिसंवाद झाला. ‘भाषा’ या माध्यमातून उत्तम करिअर होऊ शकते, असे त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. दुर्गेश सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्य संमेलनात अनेक विद्यार्थी कवी सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा