अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी पाहता बाजारात खरेदीची लगबग सुरू झाली असली तरी म्हणावी तशी ग्राहकी नसल्याने ग्राहकांची दुकानदार वाट पाहत असल्याचे चित्र शहरातील बाजारपेठांमध्ये आहे. दिवाळीसाठी खरेदी ही प्रत्येक घरात केली जाते. सर्वात आधी होते ती रंगरंगोटी. त्यासाठी विविध रंग, चुना, ब्रश आदींची खरेदी होते. दसरा आला की या खरेदीची लगबग सुरू होते. त्यासाठी गर्दी अनेक दुकानात दिसून आली.
ही खरेदी आता अंतिम टप्प्यात आहे. दिवाळी तोंडावर असल्याने इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, सदर, धरमपेठ, गोकुळपेठ, महाल, सक्करदरा, खामला, कमाल टॉकीज, मानकापूर, गिट्टीखदान, पारडी आदींसह अनेक भागातील दुकानदार सज्ज असल्याचे सध्याचे चित्र आहे.
दुकानांमध्ये वस्तूंचा भरपूर साठा आहे. विजेचे दिवे, दिव्यांच्या माळा, आकाश दिवे, कापड, साडय़ा आदींचे ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी दुकानदारांनी दुकाने सजवली आहे. अनेक ठिकाणी सेल, सवलतीचे फलक झळकत आहेत. पणत्यांचे ढीग बाजारात दिसत आहेत. याशिवाय विविध आकारातील मेणबत्त्या, मेणाचे दिवे, विविध रंगांच्या रांगोळ्या, लक्ष्मीच्या मूर्ती व छायाचित्रे, लाह्य़ा-बत्तासे, पूजेचे साहित्य आदींची दुकाने आहेत.
सराफा, सुकामेव्याची दुकानेही सज्ज असून सर्वानाच ग्राहकांची प्रतीक्षा असल्याची स्थितीत सर्वच बाजारपेठांमध्ये आहे.   या महिन्यात वेतन आणि बोनस चाकरमान्यांच्या हाती पोहोचला आहे. त्यामुळे बाजारात खरेदी सुरू झाली आहे. बाजारात जी काही थोडी फार गर्दी आहे. ती काही विशिष्ट दुकानातच. विशेषत: किराणा व धान्य दुकानात दर महिन्यासारखी नित्याची गर्दी आहे. किराणा तसेच दिवाळीसाठी लागणारी जास्तीची खरेदी केली जात आहे. याशिवाय पणत्या, आकाशदिवे, इलेक्ट्रिक माळा, कापड आदींची खरेदी सुरू आहे. सुकामेवा दुकानातही थोडीफार गर्दी दिसू लागली आले. वहीखाते दुकानात व्यापाऱ्यांची गर्दी आहे. मिठायांच्या दुकानात नेहमीचेच चित्र आहे.
बाजारात सध्या खरेदीसाठी महिलाच जास्त दिसत आहेत. कामकाजाचे दिवस असल्याने तसेच शाळांमध्ये परीक्षा सुरू असल्याने गर्दी कमीच आहे. शनिवार व रविवार सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे शनिवारपासून बाजारात प्रचंड गर्दी दिसेल.  शनिवार व रविवारी प्रचंड गर्दी बाजारात राहील. गेल्याच आठवडय़ात अशी स्थिती होती.  सीताबर्डी मेनरोडवर तसेच दुकानांमध्ये ग्राहकांना उभे राहण्यासाठी जागा नव्हती. आगामी आठवडा गर्दीचा राहणार असल्याने अनेक दुकानदारांनी दुकानाच्या वेळाही वाढविल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा