गेल्या वर्षभरात मुंबईत, विशेषत: उपनगरात सदनिकांच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी २०१४ साठी जाहीर झालेल्या रेडी रेकनरच्या दरावर नजर टाकली असता बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, चेंबूर, भांडुप, विक्रोळी आदी परिसरातील काही ठिकाणी बाजारभावापेक्षाही रेडी रेकनरचा दर महाग झाल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणजे या परिसरात हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांवर वाढीव मुद्रांक शुल्काचा बोजा पडला आहे.
रेडी रेकनरचे दर आतापर्यंत बाजारपेक्षापेक्षा कधीही जास्त नव्हते. उलट बाजारभावाच्या ५० ते ७० टक्क्य़ांपर्यंत रेडी रेकनरचे दर पोहोचले होते. गेल्या वर्षी ते बाजारभावाच्या ८० टक्क्य़ांपर्यंत होते. यावेळी ते बाजारभावापेक्षा अधिक झाले आहेत. ज्या परिसरात मालमत्तांची खरेदी अधिक असते अशा ठिकाणचे दर वाढविण्यात येतात. यंदाच्या रेडी रेकनरमध्ये अशी ७२९ ठिकाणे निश्चित करून दर वाढविण्यात आले आहेत. परंतु यापैकी अनेक परिसरात सदनिकांचे दर बाजारभावापेक्षाही अधिक झाले आहेत. त्यामुळे आपसूकच त्याचा फायदा बिल्डरांना मिळाला आहे. रेडी रेकनरचे दर वाढल्यामुळे फ्लॅटचा ‘अधिकृत’ दरही वाढला. स्वाभाविकच त्यातील ‘रोख’ पैशाचा हिस्सा (थोडक्यात अनधिकृत हिस्सा) कमी झाला आहे. यामुळे सरकारचे उत्पन्न वाढले तर बिल्डरांकडे येणाऱ्या ‘रोख’ रकमेत घट झाली आहे. रेडी रेकनरचे दर बाजारभावापेक्षा महाग झालेल्या परिसरामध्ये प्रामुख्याने अंधेरी पूर्व व पश्चिम, बोरिवली येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एक्सर, कांदिवलीतील पोयसर, मालाड पूर्वेतील दिंडोशी, गोरेगावातील पश्चिमेकडील भागाचा समावेश होतो. चेंबूर परिसरातील दरही अशाच रीतीने वाढल्याचे दिसून येत आहे. भांडुप, कांजूर तसेच मुलुंड परिसरातही खरेदीदारांना असाच अनुभव येत आहे. नव्या पद्धतीनुसार पाच टक्के मुद्रांक शुल्कासोबत सेवा कर, व्हॅट आणि नोंदणीशुल्क अशा रीतीने चौरस फुटाच्या तब्बल ११ टक्के जादा दर भरावा लागत आहे.
महागला रेडी रेकनर (कंसात बाजारभाव)
*दहिसर ८ ते ११ हजार (९ ते १० हजार);
*बोरिवली – मागठाणे, पश्चिम द्रुतगती महामार्ग, एक्सर, शिंपोली १२ ते १४ हजार (१० ते १२ हजार);
*कांदिवली – पोयसर, द्रुतगी महामार्ग, आकुर्ली ११ ते १५ हजार (११ ते १३ हजार);
*मालाड पूर्व, दिंडोशी
९ ते ११ हजार (१० ते ११ हजार);
*गोरेगाव १२ ते १३ हजार (११ ते १२ हजार);
*अंधेरी पश्चिम, वर्सोवा, डी. एन. नगर, ओशिवरा १५ ते १८ हजार (१३ ते १५ हजार).
रेडी रेकनर बाजारभावापेक्षाही महाग!
गेल्या वर्षभरात मुंबईत, विशेषत: उपनगरात सदनिकांच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी २०१४ साठी जाहीर झालेल्या रेडी रेकनरच्या दरावर नजर टाकली
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-01-2014 at 07:35 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ready reckoner becomes expensive than market