नवीन वर्षांत घर किंवा फ्लॅट घेऊ इच्छिणाऱ्यांच्या खिशाला अधिकचा भार सहन करावा लागणार आहे. राज्याच्या नगररचना विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध भागातील बाजारमूल्याच्या दरामध्ये १० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे केली आहे. याविषयी अंतिम दर पुण्याच्या मुख्यालयातून जाहीर केले जाणार आहेत.
दरवर्षी ३१ डिसेंबरला राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या विविध भागातील बाजारमूल्यांच्या दराची फेररचना केली जाते. नैसर्गिक वाढ १० टक्के असते. याशिवाय त्या त्या भागातील जमीन खरेदी विक्रीतील उलाढाल नागरिकांच्या मागणीचा कल विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांचा कल तसेच मूल्यनिर्धारण विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती बाजारमूल्यांचे दर निश्चित केले जातात. त्यानंतर या दराची शिफारस पुण्यातील महानिरीक्षक कार्यालयाकडे केली जाते. तेथूनच अंतिम दर जाहीर केले जातात. नागपूर कार्यालयाने शहराच्या विविध भागातील भूखंड फ्लॅट आणि दुकानाच्या बाजारमूल्यात सरासरी १० ते४० टक्के वाढ सुचविली आहे.
खुल्या भूखंडाच्या बाजारमूल्यात २५ टक्के, फ्लॅटच्या बाजारमूल्यात २० टक्के तर दुकानांच्या बाजारमूल्यात १८ ते २० टक्के वाढ सुचविण्यात आली आहे. सोमलवाडा ९ ते २० टक्के, चिंचभुवन २० ते २५ टक्के, जयताळा १५ टक्के, दिघोरी १० ते १५ टक्के, सीताबर्डी ९ ते १५ टक्के वाढ सुचविण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा