साहित्य म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून अंत:करणातून ते जन्माला येते. रसिकाला ते स्वत:चे जीवनानुभव वाटले पाहिजे, असे प्रतिपादन कवी अजीम नवाज राही यांनी केले.
सूर्याश साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने स्थानिक श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित पुरस्कार समारंभ, सप्तरंग कवितेचे प्रकाशन व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कवी वसंत वाहोकर यांच्या हस्ते सरदार पटेल महाविद्यालयाद्वारे पुरस्कृत चंद्रपूर भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. जाकीर शेख, हिंदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी किरण मेश्राम, कवी व नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी उपस्थित होते. याप्रसंगी श्रीपाद जोशी यांच्या हस्ते मधुकर गराटे, वर्षां चोबे, दीपक शिव, संगीता पिदुरकर, शिवशंकर घुगुल, तनुजा बोढाले आणि किशोर तेलतुंबडे यांच्या कवितांचा समावेश असलेल्या ’सप्तरंग कवितेचे’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कवितेबाबत एकंदरीत संपादकीय मनोगत डॉ. श्याम मोहरकर व कवींच्या वतीने मधुकर गराटे यांनी व्यक्त केले.
वसंत वाहोकर व किरण मेश्राम यांनी सूर्याश साहित्य व सांस्कृतिक मंच हे साहित्य क्षेत्रात शहरात महत्त्वाचे केंद्रबिंदू आहे, असे सांगितले. कवितेवर भाष्य करताना श्रीपाद जोशी यांनी, मराठी कवितेत नवोदित कवींच्या कवितांचे महत्त्व विशद केले.
अजीम नवाज राही यांच्यासह यावर्षीचा सूर्याश साहित्य पुरस्कार कथाकार व कवी प्रा. प्रकाश केळकर यांना, सूर्याश नवोन्मेष पुरस्कार नवोदित कवयित्री संगीता पिज्दुरकर व दिवंगत दिलीप बोढाले यांना, कलायात्री पुरस्कार नाटय़ कलावंत हिरालाल पेंटर यांना देण्यात आला. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी शांताराम पोटदुखे यांनी, सूर्याशने राहींना हा पुरस्कार दिल्याने आपणही मनापासून समाधानी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमानंतर यवतमाळचे ज्येष्ठ कवी सुरेश गांजरे यांच्या अध्यक्षतेखाली व विमल गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्य़ातील निवडक ३५ कवींचे संमेलन पार पडले.
कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सीमा भसारकर आणि सुरेश गारघाटे यांनी केले. प्रास्ताविक सूर्याशचे उपाध्यक्ष प्रा. रविकांत वरारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी शेष देऊरमल्ले यांनी उत्तमरित्या पार पाडली. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या रसिकांचे आभार सूर्याश साहित्य मंचचे अध्यक्ष इरफान शेख यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील रसिक व मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अंत:करणातून जन्माला येते ते खरे साहित्य -अजीम राही
साहित्य म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून अंत:करणातून ते जन्माला येते. रसिकाला ते स्वत:चे जीवनानुभव वाटले पाहिजे, असे प्रतिपादन कवी अजीम नवाज राही यांनी केले.
First published on: 28-12-2012 at 01:37 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real literature is comming from the heart ajim rahi