‘सत्यमेव जयते कार्यक्रमामुळे समाजाच्या अंतरंगात डोकावता आले, त्यातून खूप काही शिकायला मिळाले. देश वगैरे बदलण्याची भाषा आपण करणार नाही असे प्रांजळ मत मोकळेपणाने मांडतानाच‘सत्यमेव जयते मुळे माझ्यात खूप बदल झाला, तसा तो प्रत्येकाने स्वत:मध्ये घडवून आणला पाहिजे असे सांगून उपस्थितांची मने जिंकली. सत्यमेव जयतेचा सादरकर्ता तथा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने आज येथे  सांगितले. ‘बलात्कारासारख्या घटना लक्षात घेता यापुढे स्त्री अत्याचारांच्या विरोधात यापुढे आम्ही खंबीर भूमिका घेऊ’ अशी शपथही त्याने उपस्थितांना दिली.
स्नेहालय संस्थेमधील सत्यमेव जयते उपक्रमाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व अनैतिकमानवी वाहतूक या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेला आज सकाळी संस्थेत प्रारंभ झाला. उदघाटनाच्या सत्राला अमिर खानसह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, संस्थेचे प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. प्रवीण पाटकर, अभिजित पवार, स्वाती व सत्यजित भटकळ आदी या वेळी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने हजारे यांच्या हस्ते आमिर खानचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पहिल्याच सत्रात या मान्यवरांची प्रकट मुलाखत राजीव गोस्वामी, अभिजित क्षीरसागर यांनी घेतली. या मुलाखतीतूनच त्यांचा संवाद खुलत गेला.
समजात असंख्य अडचणी आहेत, त्या प्रामुख्याने सत्यमेव जयते कार्यक्रमामुळेच माझ्यासमोर आल्या असे आमिर खानने सुरुवातीलाच स्पष्ट केले. प्रचलित अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेली गरीब व श्रीमंत ही दरी आपल्याला कमालीची सतावते. उपाय लगेच सापडत नाही मात्र यावर काहीतरी प्राधान्याने केले पाहिजे असे मनोमन वाटते. ही दरी मिटल्याशिवाय समाजात सौख्य निर्माण होणार नाही. सत्यामेव जयतेमुळे प्रामुक्याने स्त्रीभ्रूणहत्येविरोधात देशात जागृती झाली याचे समाधान मोठे आहे असे आमिर खानने सांगितले.
हजारे यांनी मार्ग भिन्न असले तरी आमिर खान व आपले ध्येय एकच आहे असे सांगितले. दिल्लीच्या संसदेपेक्षा जनसंसद मोठी आहे. केवळ सत्तेत परिवर्तन हे आपले ध्येय नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. दुपारच्या सत्रात अनैतिक मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या तिघींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. पाटकर यांचे बीजभाषण झाले. या कार्यशाळेस १६ राज्यांतील स्वयंसेवी संस्थांचे १७५ प्रतिनिधी उपस्थित आहेत.
 

Story img Loader