दुष्काळाचे भयसंकट मागे ठेवून २०१२ वर्ष सरले. नव्या वर्षांत हे संकट अधिकच गडद होणार याचा प्रत्यय सरत्या वर्षांच्या अखेरच्या दिवशी औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी गावात आला. उद्याचे भवितव्य किती भयसूचक असणार आहे, याचेही हे प्रातिनिधिक चित्र ठरावे. टँकरवर पाणी भरण्यास गेलेल्या अजय भालेराव (वय १३) या मुलाचा टँकरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या एकाच घटनेमुळे दुष्काळाची तीव्रता कशा प्रकारे भयावह होत आहे, ते स्पष्ट व्हावे.
गेल्या आठ दिवसांपासून लाडसावंगीत एक वेळाच टँकर येतो. टँकर आल्यावर पाणी भरण्यास तोबा गर्दी होते. घाई एवढी असते की, घोटभर पाण्यासाठी लोक धावाधाव करतात. दुपारच्या वेळी झालेल्या या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. दुष्काळी स्थितीमुळे अजयचे आई-वडील काम शोधण्यास शहरात आले होते. आठवीत शिकणारा अजय पाणी भरण्यासाठी गावात थांबला असता तो टँकरच्या मागच्या चाकाखाली आला. त्याच्यावर काळाने घाला घातला. दुष्काळाचे असे भयाण चित्र मराठवाडय़ात गावोगावी दिसत आहे. शेती पिकली नाही, पिण्यासाठी पाणी नाही. दुष्काळ आवडे सर्वाना असे वातावरण सर्वत्र आहे. सरकारी पातळीवर निधीच्या आकडेवारीचा फुगवटा दिवसेंदिवस वाढत आहे. स्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासन दाखवत असले तरी मराठवाडय़ातील दुष्काळ येत्या वर्षांत अधिक गडद होईल, असेच चित्र आहे.
जानेवारीच्या पहिल्या तारखेलादेखील मराठवाडय़ात ४८५ टँकरने पिण्याचा पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. एक विहीर आटली की, नव्या विहिरीसाठी अधिग्रहणाचा प्रस्ताव ठेवला जात आहे. १ हजार ११५ विहिरींमधून पाणी उपसण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. निधीच्या लढाईत मराठवाडय़ातील नेते अजून उतरलेच नाहीत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याची तीव्रता मराठवाडय़ापेक्षा अधिक आहे, असे चित्र राज्यपातळीवर रंगविले जाते. सांगली-साताऱ्यातील वाद मंत्रिमंडळातील विषय ठरत आहे. मात्र, मराठवाडय़ासाठी आवश्यक असणारा निधी आणि शेतकऱ्यांना हवा असणारा दिलासा मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. जानेवारी महिन्यात मराठवाडय़ातील माजलगाव, मांजरा, निम्नदुधना, तेरणा ही धरणे कोरडीठाक आहेत. येलदरी, सिद्धेश्वर या धरणात थोडय़ा-फार प्रमाणात पाणीसाठा आहे. नांदेडवगळता सर्व जिल्ह्य़ांमध्ये पाणीटंचाईची भीषणता दिवसागणिक वाढते आहे.
ऊसपिकाला अधिक पाणी लागते. त्यामुळे साखर कारखान्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती होत असली तरी औरंगाबाद भोवतालच्या बीअरच्या कारखान्यांविषयी मात्र फारसे कोणी बोलत नाही. अधून-मधून एखादा विरोध होतो. पिण्याच्या पाण्याबरोबरच जायकवाडीतून त्यांच्या पाण्याची सोय निश्चित झाली आहे. बीड जिल्ह्य़ातील बिंदूसरा तलाव जानेवारीत प्रथमच कोरडा झाला. जनावरांच्या छावण्यांमध्येही येत्या काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे. बीड, उस्मानाबाद, जालना आणि औरंगाबाद या चारही जिल्ह्य़ांत दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार आहे. सरकारी पातळीवर नियोजन सुरू असले तरी ते कितपत प्रत्यक्षात उतरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्वसामान्य माणसांचे हाल होतील, अशीच भयसूचक घंटा नवीन वर्षांत घणाणत राहिली. समस्या सोडवणुकीसाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे.

Story img Loader