माझा दिवस दुपारी चार वाजता सुरू होतो, कारण मी तेव्हाच झोपून उठते. त्यानंतर मी फारसं काही करत नाही. शाळा-कॉलेजचं तोंड पाहायची वेळ माझ्यावर क्वचितच येते. मी उठतेच इतक्या उशिरा की त्या वेळेला कॉलेजमध्ये जा.. असं सांगण्यात काही अर्थच नसतो. मग मी थोडा वेळ इकडे-तिकडे करते, काही खाते-पिते, मित्रमैत्रिणींना फोन करते आणि संध्याकाळी त्यांच्याबरोबर ‘चिलआऊट’ करण्यासाठी बाहेर पडते. मध्यरात्री उशिरानंतर कधीतरी मी घरी येते आणि झोपते. याशिवाय, मी खरंतर काहीच करत नाही म्हणजे मला काही करायची गरजच पडत नाही. मला जगण्यासाठी पैसा हवा असतो जो माझे आई-बाबा हवा तितका देतात. माझा महिन्याचा खर्च एक लाखाच्या आसपास आहे..
असं जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर तुमची काय प्रतिक्रिया होईल? श्रीमंतांची बिघडलेली पोरं, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर रईसजादे. तुम्ही-आम्ही त्यांना उपहासाने रईसजादे म्हणत असलो तरी त्यांना त्याची फिकीर नसते. किंबहुना तेच त्यांच्या अंगवळणी पडून गेलं आहे. आपण रईसजादे, नालायक अशी दिलेली विशेषणं त्यांना पदवीसारखी वाटतात नव्हे ते तसंच मिरवतात. अशा रईसजाद्यांशी आमची गाठ पडली ते हिमाचल प्रदेशच्या गोठवून टाकणाऱ्या थंडीत. सत्य हे कल्पितापेक्षाही भयंकर असतं, याची प्रचीती ‘बिग स्विच’ नामक रिअॅलिटी शोच्या या स्पर्धकांना पाहून येत होती. त्यांचं तसं नालायक असणं ही या रिअॅलिटी शोसाठीची पात्रता आहे. ‘बिग स्विच’ या यूटीव्ही बिंदास वाहिनीवरील रिअॅलिटी शोने देशभरातून निवडून आणलेल्या या रईसजाद्यांना ठाकून ठोकून वास्तवाचे भान आणून देण्याचा, सामान्य माणसाप्रमाणे जगायला लावण्याचा विडा उचलला आहे. या शोचे हे चौथे पर्व असून ‘इंडियाज् टफेस्ट रईसजादा’ शोधण्याचं हे मिशन ‘बिग ब्रदर’ गौरव चोप्राच्या मदतीने करण्यात येणार आहे.
दिल्ली, चंदीगढ, पंजाब आणि मुंबई या चार शहरांमधून सगळ्यात जास्त पैसे उडवणारी, दारूच्या आहारी गेलेली, सगळ्या प्रकारची व्यसनं करणारी अशी ही तरुण मुलं-मुली निवडण्यात आली आहेत. या मुलांना हिमाचल प्रदेशसारख्या परिसरात जिथे रोजच्या जगण्यासाठीही निसर्गाशी लढा द्यावा लागतो तिथे तंबूत राहायला लावायचं आणि अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टी मिळवण्यासाठी लाकूडतोड, रस्ते तयार करणं, शहरातला कचरा उचलणं अशी त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल इतकी कठीण कामं करायला लावायची, अशी या शोची संकल्पना आहे. या शोचा सूत्रसंचालक असलेल्या गौरव चोप्राच्या मते, या मुलांना कोणी पाहिलं किंवा त्यांच्याशी बोललं तर असं वाटतं की कोणत्या विश्वात राहतात हे लोक. त्यांना कोणीतरी चांगले फटके देऊन वास्तवाचे भान आणून देण्याची गरज आहे. या शोमध्ये मी त्यांचा ‘बिग ब्रदर’ आहे आणि त्या नात्याने सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी सामान्य माणसाला किती झगडावं लागतं, याची जाणीव त्यांच्यात निर्माण करणं हे माझं काम आहे. मी जर ते करू शकलो तरच हा शो यशस्वी झाला असं म्हणता येईल, गौरव सांगतो. या मुलांना निवडल्यानंतर त्यांच्या पालकांना या शोची पूर्ण कल्पना देण्यात आली होती. पण, एरव्ही स्वत:चा चहाचा कपही न उचलणाऱ्या या मुलांना शहरातला कचरा उचलताना पाहायचं म्हणजे.. त्यांच्या पालकांनी विरोध नाही केला? या प्रश्नावर गौरव हसून सांगतो, तुम्हाला खोटं वाटेल पण त्यांच्या आई-वडिलांनी हसत हसत या शोसाठी परवानगी दिली. आमची मुलं वाया गेलेली आहेत, ती आमच्या हाताबाहेर गेली आहेत, या शोच्या निमित्ताने त्यांना काहीतरी करताना आम्हाला पाहता येईल, अशी त्यांची प्रतिक्रिया होती.
रिअॅलिटी शोची ही संकल्पना चांगली की वाईट हा मुद्दा नाही. या शोच्या माध्यमातून ही मुलं पूर्ण बदलतील असंही नाही. मुंबईचा अभिमन्यू थापर असू दे, दिल्लीची काजल त्यागी असू दे नाहीतर चंदिगढची प्रीत पाल असू दे. या सगळ्यांनीच शोमध्ये आल्यानंतर आम्हाला अशा गोष्टींची जाणीव झाली जी पूर्वी कधीच झाली नव्हती, याची कबूली दिली. पण, त्यामुळे आमची जीवनशैली बदलेल, असं होणार नाही हेही स्पष्टपणे सांगितलं. मग असे शो दाखवण्यामागचा हेतू काय, या प्रश्नाचं उत्तर शोच्या आयोजकांकडेही नाही. रिअॅलिटी शोच्या नावाखाली या मुलांना घडवण्याचा दावा वाहिनीकडून करण्यात येत असेलही, पण असे शो दाखवून आपण टीव्हीला चिकटलेली एक संपूर्ण पिढी तर बिघडवत नाही ना, याचा विचार टीआरपीच्या रेसमध्ये मश्गूल असणाऱ्या वाहिन्यांनी करायला हवा.
मालिका ते रिअॅलिटी शो व्हाया हॉलीवूड – गौरव चोप्रा
एकता कपूरच्या मालिकांनी ज्या अनेक चेहऱ्यांना घराघरांत पोहोचवलं त्यातलंच एक नाव म्हणजे गौरव चोप्रा. ‘पिया का घर’, ‘कर्मा’, ‘कभी हाँ कभी ना’ अशा किती तरी मालिका गौरवने केल्या, पण त्या वेळी मालिकांमध्ये गाजलेले हे सगळे कलाकार जसे गायब झाले तसे गौरवही गायब झाला होता. त्यानंतर तो दिसला हॉलीवूडच्या ‘ब्लड डायमंड’ या चित्रपटात एका छोटय़ाशा भूमिकेत. सध्या तो ‘उतरन’ ही मालिका करतो आहे आणि आता यूटीव्ही बिंदास वाहिनीच्या ‘बिग स्विच’ या नव्या शोमध्ये तो सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘मी छोटय़ा पडद्यापासून लांब गेलो होतो त्याचं कारण म्हणजे मला एका आंतरराष्ट्रीय ब्रॉडवे शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ‘बॉम्बे क्रश’ हा शो मी करत होतो. त्याचे आफ्रिकेत आणि युरोपमध्ये अनेक शोज् झाले. या शोमुळेच मला ‘ब्लड डायमंड’ चित्रपटातील फ्रेंच पत्रकाराची भूमिका मिळाली,’ असे गौरव सांगतो. आता ‘बिग स्विच’मध्ये मी सूत्रसंचालक म्हणून नव्या भूमिकेत दिसणार आहे. मी स्वत: स्पर्धक म्हणून विविध रिअॅलिटी शोज् केलेले आहेत. त्यामुळे स्पर्धकांची मानसिकता काय असते, हे मी जाणून आहे. त्यांच्या भावना एकीकडे समजून घ्यायच्या आणि तरीही त्यांना वठणीवर आणायचं कामही मला तितक्याच कडकपणे करायचं आहे. या शोच्या संकल्पनेपासून मला यात सहभागी करून घेतलं गेलं आहे. अगदी या मुलांना काय काम द्यायचे, त्यातून आपल्याला काय साध्य करून घ्यायचं आहे यावर आमची दररोज तीन-चार तास चर्चा होते आणि मग आम्ही प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात करतो. त्यामुळे एक कलाकार म्हणून माझ्यावर जो विश्वास वाहिनीने दाखवला त्याबद्दल मी समाधानी आहे. आता या शोमध्ये मला सूत्रसंचालक म्हणून निवडण्याचा जो उद्देश होता तो सफल झाला तर मी माझ्या कारकिर्दीतली ही आणखी एक लढाई जिंकेन, असा विश्वास गौरव व्यक्त करतो. याआधी गौरवचे नाव अभिनेत्री नारायणी शास्त्रीशी जोडले गेले होते. त्यानंतर मौनी रॉय या अभिनेत्रीबरोबर त्याचे सूत जमले, पण हे प्रेमसंबंधही वर्षभरापूर्वीच संपुष्टात आले. मौनीबरोबरच्या माझ्या नात्याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही. मला एवढंच सांगायचं आहे की, सध्याच्या जमान्यात प्रेमासारख्या नात्याकडेही गंभीरपणे बघण्याची कोणाची तयारी नसते. मला वाटतं की स्त्री-पुरुष नात्यातली मैत्री कोयम राहिली पाहिजे. सध्या तरी मी एकटाच आहे आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित केलं आहे. गौरव लवकरच ‘रंगदारी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.