मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनाही आपल्या शहराला फेरीवाल्यांचा विळखा बसल्याचा उशिरा का होईना साक्षात्कार झाला असून, शहरातील पदपथ आणि रस्ते फेरीवालामुक्त केले जावेत, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत केली.
नगरसेवकांनी आक्रमक रूप धारण करताच येत्या काळात शहरातील प्रमुख रस्ते तसेच पदपथांवरील फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम हाती घेतली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानके व ना फेरीवाला विभागातून फेरीवाल्यांना हटविण्याच्या विषयावर नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मनसे, शिवसेना, काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. पालिका कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे फेरीवाल्यांची दादागिरी वाढत आहे. फेरीवाल्यांना हटविण्याचे नाटक करून फेरीवाल्यांकडून हप्तेखोरी करणाऱ्या दिलीप ऊर्फ बुवा भंडारी या फेरीवाला हटाव पथकाच्या प्रमुखावर नगरसेविका मनीषा धात्रक, कोमल निग्रे, कल्याणी पाटील, मंदा पाटील या नगरसेविकांनी टीकेची झोड उठवली. या वेळी भंडारी यांना निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात गुप्ता नावाचा फेरीवाला वतनदारासारखा व्यवसाय करतो. एका फेरीवाल्याची ४० दुकाने आहेत, पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. डोंबिवलीच्या छत्रपती भाजी मंडईत रसवंतीगृह, कपडय़ांची दुकाने सुरू आहेत. प्रभाग अधिकारी, त्यांच्या पथकप्रमुखांचे या धंदेवाल्यांशी साटेलोटे असल्याने कारवाई होत नाही, अशी टीका वामन म्हात्रे, वैशाली राणे यांनी केली. आयुक्तांच्या धरसोड वृत्तीमुळे फेरीवाल्यांचा उपद्रव वाढला आहे, अशी टीका नगरसेविका धात्रक यांनी केली. दरम्यान, आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
कल्याण डोंबिवली खरंच फेरीवालामुक्त होणार?
मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनाही आपल्या शहराला फेरीवाल्यांचा विळखा बसल्याचा उशिरा का होईना साक्षात्कार झाला असून, शहरातील पदपथ आणि रस्ते फेरीवालामुक्त केले जावेत, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत केली.
First published on: 30-01-2013 at 12:57 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Really the kalyan dombivli become hawkers less